रहाटणीतील विद्यादीप शिक्षण संस्थेच्या सचिवा विरोधात पोलिसात तक्रार
पिंपरी चिंचवड: मुलाच्या शाळा प्रवेशासाठी आलेल्या विवाहितेला शिक्षण संस्थेच्या सचिवाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी रहाटणी परिसरातील विद्यादीप शिक्षण संस्थेच्या माने हायस्कूलमध्ये घडला. या घटनेमुळे परिसरातील संतप्त पालकांनी गर्दी केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. संबधीत महिलेने अक्षय गंगाराम माने (रा. राजवाडेनगर, रहाटणी) यांच्या विरुद्ध काळेवाडी चौकीमध्येे तक्रार दाखल केली आहे.
संतप्त पालकांमुळे तणाव
मिळालेल्या माहितीनुसार, माने हायस्कुलमध्ये दीपाली पोपट वाघमारे (रा. राजवाडेनागर, रहाटणी ) आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी आल्या होत्या. त्यांनी शाळेतील कर्मचार्यांना प्रवेश शुल्कासंदर्भात माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांनी तेथे असलेल्या संस्था अध्यक्षांचा मुलगा अक्षय यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रवेशासाठी नकार दिला. यावरून महिला आणि अक्षय यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत गेला. यात अक्षय यांनी अंगावर धावून जात धक्काबुक्की करत ढकलून दिले. या घटनेने परिसरातील पालक आणि नागरिक संतप्त झाले. त्यानंतर काही वेळ शाळेत गोंधळ सुरू होता. संतप्त नागरिकांनी थेट काळेवाडी चौकी मध्ये येऊन अक्षय यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वाकड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पिंजन यांना दिले.