मुलाच्या वाढदिवशी आईची मेहरुण तलावात आत्महत्या

0

व्हॉटस्अ‍ॅपवरुन फोटो व्हायरल झाल्याने पटली ओळख ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव- मेहरुण तलावात आशा दिलीपकुमार नाथाणी वय 50 रा. गायत्रीनगर या महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. एकुलता एक मुलगा विवेक नाथाणी याचा शनिवारी वाढदिवस होता, रात्री वाढदिवस साजरा करायचे ठरले होते, मात्र त्यापूर्वीच आई आशा नाथाणी यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे, त्यांचे आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

पती व मुलगा कामनिमित्तान होते बाहेरगावी
शहरातील गायत्रीनगरात दिलीपकुमार माणिकमल नाथाणी हे पत्नी आशा व मुलगा विवेक यांच्यासह वास्तव्यास आहेत. याठिकाणी वरच्या मजल्यावर आशाबाई यांची बहिणी मनिषा इंद्रकुमार नाथाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत दिलीपकुमार हे ज्या गावांचा बाजार असतो, त्यादिवशी त्या गावांमध्ये कपड्याचे दुकान लावून कपडे विक्री करतात. शनिवारी वावदड्याचा बाजार असल्याने ते त्याठिकाणी गेले होते. तर त्याचा मुलगा विवेक हा खाजगी नोकरीला असून तो कामानिमित्ताने बाहेरगावी घरी एकट्याच आशा नाथाणी होत्या.

पट्टीच्या पोहणार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला
आशा नाथाणी या दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या. त्यांना घराबाहेर जातांना त्यांची बहिणी मनिषा नाथाणी यांनी बघितले. मात्र जवळपास कुठेतरही जात असतील म्हणून मनिषा यांनी विचारपूस केली नाही. आशा नाथाणी ह्या मेहरुण तलावावर पोहचल्या. याठिकाणी त्यांनी म्हशींचा गोठा असलेल्या परिसरात तलावाच्या मागच्या बाजूने पाण्यात आत्महत्या केली. आशा नाथाणी यांचा मृतदेह तरंगत असतांना या परिसरात गोपाळ कोळी, प्रशांत पाटील यांना महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्यांनी तत्काळ मेहरुण परिसरातील पट्टीचे पोहणारे समाधान नाईक, शरद वंजारी यांना फोन करुन प्रकार कळविला. नाईक व वंजारी यांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह पाण्याबाहेर काढून एमआयडीसी पोलिसांना प्रकार कळविला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी डॉ. आकाश चौधरी यांनी मृत घोषित केले.

व्हॉटस्मुळे पटली तत्काळ ओळख
वर्णनावरुन महिला सिंधी कॉलनीतील असल्याच्या शक्यतेवरुन समाधान नाईक तसेच पोलिसांनी घटना सिंधी कॉलनीतील माजी नगरसेवक अशोक मंधान यांना कळविली. मंधान यांनी तसेच सुरज सटाणा या तरुणाने महिलेचे छायाचित्र सिंधी कॉलनीच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपवर टाकले. छायाचित्र टाकताच, मयत आशा यांचा भाचा साहिल नाथाणी याने सटाणा यास विचारपूस केली. माहिती घेवून ओळख पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गाठले. याठिकाणी मयत आशा नाथाणी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर घटना त्यांचे पती दिलीपकुमार नाथाणी यांना कळविण्यात आली. त्यांनी रुग्णालय गाठून आक्रोश केला. घटनेची माहिती कळाल्यावर नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

रात्री करणार होते मुलाचा वाढदिवस साजरा
दिलीप कुमार नाथाणी हेही कामानिमित्ताने बाहेरगावी तर विवेक हाही नोकरीच्या ठिकाणी असलेल्या वसुलीच्या कामानिमित्ताने अहमदनगर येथे गेला होता. विवेकचा वाढदिवस असल्याने तो रात्री परतल्यावर वाढदिवस साजरा करणार होते. मात्र त्यापूर्वीच आशा नाथाणी यांनी आत्महत्या केली. आईच्या मृत्यूची बातमी सायंकाळी उशीरा नातेवाईकांनी कळविली. मानसिक धक्का बसू नये म्हणून त्याची समजूत काढण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर तो जळगावला यायला निघाला होता.