मुलाच्या विरहात टोणगावच्या दाम्पत्यासह मुलीची आत्महत्या !

0

भडगाव शहरात हळहळ ; आठ दिवसांपूर्वीच मुलाचा झाला होता खून

भडगाव- शहरातील टोणगाव भागातील बांगडी व्यावसायीक दाम्पत्याने आपल्या 15 वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याच्या मुलाचा गेल्या आठ दिवसांपूर्वीच केळीच्या शेतात निर्घूण खून करण्यात आला होता तर मुलाच्या विरहात या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात असलेतरी पोलिस प्रशासनाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. बब्बू लल्लन सैय्यद (48), पत्नी पिंकी बब्बू सैय्यद (38), मुलगी स्नेहा बब्बू सैय्यद (15) असे मयत कुटुंबियांची नावे आहेत. पोलिसांना घटना कळवल्यानंतर त्यांना दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढत ते शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान, नेमकी ही आत्महत्या की घातपात? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मुलाच्या विरहात आत्महत्या?
पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या मागे केळीच्या शेतात टोणगावातील बांगडी व्यावसायीकाचा मुलगा ईसम बब्बु सय्यद (9, रा. फतेहपुर, उत्तरप्रदेश, ह.मु.भडगाव) या बालकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गत आठवड्यात घडली होती. मृताचे वडील बब्बू सय्यद गेल्या एक वर्षापासून शहरातील टोणगाव भागात बांगडीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत करतात. त्यांचा मुलगा ईसम गत गुरुवारपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच गत शुक्रवार, 22 मार्च रोजी दुपारी चार वाजता शहरातील पाचोरा रस्त्यालगत रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयामागे केळीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. दरम्यान, मुलाच्या विरहात बांगडी व्यावसायीक बब्बू सय्यद, त्यांची पत्नी व मुलीनेही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे मात्र त्यास पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

पोलिस प्रशासनाची धाव
टोणगावच्या बांगडी व्यावसायीक कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक नजीर शेख, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, सहाय्यक निरीक्षक आनंद पठरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आत्महत्येप्रकरणी भडगाव पोलिसात बेग मुराद बेग मिर्झा (टोणगाव) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.