पिंपरी-चिंचवड : आई-वडिलांमध्ये वारंवार होत असलेल्या भांडणातून सराईत गुन्हेगार मुलानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी टिकाव मारून खून केला. खून करून मृतदेह मुळा नदीच्या पुलाजवळ फेकून दिला. मृतदेहाची ओळख पटली नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास लावणे आव्हानात्मक झाले होते. दरम्यान, अॅन्टी गुंडा स्कॉडच्या (उत्तर) पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन अटक केली. रमेश रामचंद्र वाघेरे (वय-55), असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. रमेश यांचा मुलगा बजरंग रमेश वाघेरे (वय-28, रा. गोलांडे बिल्डिंगसमोर, पिंपरीगाव) याला अटक झाली आहे. बजरंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 18 गुन्हे दाखल आहेत.
ओळख मिटविण्यासाठी मृतदेह ठेचला
आरोपी बजरंग याच्या आई-वडिलांचे एकमेकांशी जमत नसल्याने ते पंधरा वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. त्याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. याच वादातून बजरंग याने 13 मे 2016 रोजी घराजवळ सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील लोखंडी टिकावाने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. बजरंगने त्याचा मित्र विशाल सुनील साळवे (वय-19, रा. पिंपळे सौदागर) याच्या दुचाकीवरून जखमी अवस्थेत रमेश यांना चौंधे लॉन्स विशालनगर बालेवाडी रोड येथील मुळा नदीच्या पुलाजवळ घेऊन गेला. या ठिकाणी त्याने रमेश यांचा डोक्यात दगड घालून खून केला. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने अनोळखी इसमाच्या नावे सांगवी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
संशयित आहे हिस्ट्रीशिटर
अॅन्टी गुंडा स्कॉड (उत्तर) मधील पोलिस शिपाई तेजस चोपडे यांना या गुन्ह्यातील खुन्याची माहिती मिळाली. हा संशयित पिंपरी येथील नाव्ही आळी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व सापळा रचण्यात आला. संशयिताच्या मुसक्या आवळताच त्याने खुनाचा गुन्हा कबूल केला. वाघेरे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध ठाण्यात 18 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 2 खुनाचे, 1 खुनाचा प्रयत्न, 2 दरोड्याच्या तयारी, 1 जबरी चोरी, 1 खंडणी, 6 मारामारी, 1 जिवे मारण्याची धमकी देणे, 1 जबरदस्तीने घरात घुसणे, 1 जबर दुखापत करणे तसेच गाड्यांची तोडफोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, नागेश भोसले, विष्णू पांडुळे, अब्दुलकरीम सय्यद, रमेश भिसे, राजेद्र शिंदे, दिनेश साबळे, सचिन कदम, दत्ता फुलसुंदर, नवनाथ चांदणे, शीतल शिंदे, बुवा कांबळे, तेजस चोपडे, सचिन जाधव, शैलेश नाईक यांनी केली.