मुलामुलींना संस्कारांसह मूल्यवर्धित शिक्षण देण्याची आवश्यकता

0

भुसावळ । महानिर्मिती मधील महिलांची सद्यस्थिती लक्षात घेता महिला सर्वच विभागात कार्यरत असून विविध वरिष्ठ पदांवर महिला पोहचल्या आहे. महिलांना काटकसरीच्या, बचतीच्या नियोजनाची सवय असते. अशा महिला अधिकारपदावर आल्यावर याचा फायदा नक्कीच व्यवस्थापनास होणार आहे. आपल्या मुला, मुलींना आम्ही संस्कार मूल्यवर्धित शिक्षण दिले पाहिजे. महिलांचे निरोगीपण अतिशय मह्त्वाचे असून त्यावरच संपूर्ण घराचे निरोगीपण अवलंबून असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता अभय हरणे यांनी केले.

विविध तपासण्या करुन शंकांचे निरसन
दीपनगर विद्युत केंद्रात महानिर्मितीच्या राज्यस्तरीय उपक्रमाअंर्तगत रविवार 5 रोजी जागतिक महिला दिना निमित्ताने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरासाठी ख्यात स्रीरोग तज्ञ डॉ. प्रीती दोषी, डॉ.विनोद पाटील, डॉ.कुतुब आणि डॉ.रवी कुकरेजा हे उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिलांच्या वैद्यकीय समस्या, सांधे दुखी, हाडांची तपासणी, रक्तदाब, रक्तगट, इसीजी आदी तक्रारींबाबत तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. दीपनगर वसाहतीमधील रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबीर सुरु होते.

महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे
या मोफत असलेल्या शिबिराचा लाभ वसाहतीमधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी महिला तसेच परिसरातील महिलांनी घेतला. शिबिराच्या सुरुवातीस सर्व उपस्थित मान्यवर डॉक्टरांचे व्यवस्थापनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. स्रीरोग तज्ञ डॉ. प्रीती दोषी आणि डॉ.रवी कुकरेजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यावेळी डॉ. प्रीती दोषी आणि अध्यक्षस्थानी असलेले मुख्य अभियंता अभय हरणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रीती यांनी महिलांनी काम आणि घराच्या व्यापात स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्ष करू नये. उपचारासाठी चालढकल करू नये. काम आणि घराएवढेच आपल्या आरोग्यास महत्त्व द्यावे. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला पोहोचल्या नाहीत. आपल्या शिक्षणाचा आणि संस्काराचा बखुबी वापर करून आपल्या कार्यक्षेत्रात आपला ठसा तुम्ही उमटविण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शैला सावंत यांनी केले तर आभार डॉ. जयंत पाटील यांनी मानले. प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्य अभियंता नितीन गगे आणि अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, राजेश राजगडकर, विजय बारंगे, एम.बी. पेटकर, एम.बी. अहिरकर, सी.एन. निमजे, एन.आर. देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार, डॉ.बी.एन. पाटील, जयश्री जिरापुरे, प्रवीण बुटे, यशवंत सिरसाट आणि रुग्णालयातील कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.