मुलासमोर बापाचा पाण्यात बुडून मृत्यू

0

जळगाव | मेहरुण तलावात मुलासोबत पोहण्यासाठी गेलेल्या नरेंद्र सुरेश तायडे (वय-३५) या पित्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतहेद पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील एमडीएस कॉलनीतील रहिवासी असलेले नरेंद्र तायडे हे मयत युवकाचे नाव आहे. दरम्यान नरेंद्र यांना पोहता येत असल्याने ते आपला मुलगा शुभम याच्या सोबत मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी नरेंद्र हे एकटेच पाण्यात उतरले तर शुभम हा तलावाच्या काठावर बसला होता. याचवेळी नरेंद्र हे तलावात दूरपर्यंत गेले असल्याने जोरदार आलेल्या लाटेमुळे त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांना दम सुटला आणि गुदमरल्यामुळे वडील पाण्यात बुडत असल्याचे शुभमच्या लक्षात आले. यावेळी शुभम याने आरडाओरड केली. परंतु त्या ठिकाणी कोणीही नसल्याने नरेंद्र यांना मदत मिळू शकली नाही. यावेळी पट्टीचे पोहणारे विजय शिंदे, प्रकाश पारधी, गोपाळ हटकर, दीपक हटकर, विकार सिद्दीकी, अफजल पिरजादे, राहूल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून त्यांनी अवघ्या काही वेळातच नरेंद्र यांचा मृतदेह पाण्यात बाहेर काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडील बुडल्याची फोनवरुन दिली माहिती
पाण्यात पोहण्यासाठी गेले शुभमचे वडील अचानक दिसत नसल्यामूळे शुभमने वडीलांच्या मोबाईलवरुन घडलेल्या घटनेची माहिती आईला दिली. दरम्यान अवघ्या काही मिनीटात परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मोलमजूरी करुन करायचे उदनिर्वाह
नरेंद्र सुरेश तायडे यांचे मूळ गाव हे यावल तालुक्यातील अट्रावल हे असून ते गेल्या दहावर्षांपूर्वी कामानिमीत्त रामेश्वर कॉलनीतील एमडीएस कॉलनीत स्थायी झाले होते. दरम्यान नरेंद्र हे मिळेल ते काम करीत मोलमजूरी करुन आपल्या संसाराचा गाडा ओढीत होते. अचानक पाण्यात बुडून नरेंद्र यांचा मृत्यू झाल्याने रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली आहे.