एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; फसविणारा नातेवाईक अटकेत
जळगाव – मुलाला आरोग्य खात्यात चालक म्हणून लावून देण्याचे आमिष दाखवत कुसुंबा रायपूर येथील सेवानिवृत्त रेमंड कर्मचारी मधुकर नारायण बाविस्कर वय 60 यांची त्यांच्याच जवळच्या नातेवाईकाने 5 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचार्याचा मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे रा. केकतनिंभोरा ता.जामनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कुसूंबा येथील मधुकर नारायण बाविस्कर हे रेमंड कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पत्नी दोन मुले व सून असा त्यांचा परिवार आहे. मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह नाशिक वास्तव्यास आहे. लहान मुलगा महेश चालक म्हणून खासगी नोकरी करतो.
10 लाख मागितले अन् नऊ लाखांत ठरले
मधुकर बाविस्कर यांचा नातेवाईक मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे रा. केकत निंभोरा ता. जामनेर यांनी महेशला चालक म्हणून आरोग्य खात्यात लावून देतो असे सांगून 10 लाख रूपये लागतील असे सांगितले. त्यावर 9 लाख रूपये देईल असे सांगितल्यानंतर मधुकर बाविस्कर यांनी 11 नोव्हेंबर 2014 रोजी एकनाथ सोनवणे यांना सुरूवातीला 1 लाख रूपये रोख आणि मुलाचे सर्व कागदपत्रे नातवाईक सोनवणे यास दिले.
हातऊसनवारी, प्लॉट विकून दिले 9 लाख रुपये
काही महिन्यानंतर बाविस्कर यांनी पुन्हा 14 सप्टेंबर 2015 रोजी सोनवणे यास 50 हजार रूपये दिले. तेव्हा बाविस्कर यांनी मुलास नोकरी केव्हा लागेल अशी विचारणा केली, त्यावर सोनवणे याने तुम्ही मला संपूर्ण पैसे द्या, मी तुमच्या मुलास आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून ऑर्डर काढून देतो, असे उत्तर दिले. यानंतर बाविस्कर यांनी सोनवणेवर विश्वास ठेवून 24 फेब्रुवारी 2016 रोजी 1 लाख रूपये, 24 मार्च 2016 रोजी 2 लाख 45 हजार रूपये, 16 जुन 2016 रोजी प्लॉट विकून 1 लाख 25 हजार रूपये, 21 जुन 2017 रोजी पुन्हा प्लॉट विकून 1 लाख 50 हजार रूपये, 24 जुलै 2016 रोजी 1 लाख 30 हजार रूपये असे एकुण 9 लाख रूपये दिले.
ऑर्डर मागितल्यावर शिवीगाळ करुन धमकी
30 ऑक्टोबर 2017 रोजी बाविस्कर हे मुलासह जामनेर येथील बसस्थनाकावर सोनवणे यास भेटले. त्याला नोकरीची ऑर्डर कधी देतो, अशी विचारणा केल्यावर बाविस्कर यांना उलट सुलट शिवीगाळ केली, नातेवाईकांमध्ये माझी बदनामी करतो काय? तुझ्याने जे होईल ते करुन घे, असे अरेरावी करुन धमकी दिली व निघून गेला. पैसे करत करण्याचा तगादा लावल्यावर सोनवणे याने पैसे परत करण्याबाबत नोटरी करुन दिली. व त्यानुसार एकदा 2 लाख तर दुसर्यांदा 1 लाख 40 हजार असे एकूण 3 लाख 40 हजार रुपये बाविस्कर यांना परत केले. उर्वरीत पैसे आज देतो उद्या देतो, असे म्हणत उर्वरीत 5 लाख 60 हजाराची रक्कम परत केली. पैसे करत नसल्याचे लक्षात आल्यावर बाविस्कर यांनी अखेर 12 नोव्हेंबर 2019 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यावरुन एकनाथ सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.