शिवकॉलनीतील घटना ; मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शारीरीक व्याधींमुळे त्रस्त असल्याचा उल्लेख
जळगाव- परदेशात वास्तव्यास असलेली मुलगी व मुंबई येथे शिकत असलेला भावी संशोधक मुलगा या दोघांना घरी बोलावून घेतले, त्याची शेवटची भेट घेवून नूतन मराठा विद्यालयाचे प्रा. किशोर यादवराव देशमुख (वय 58 रा. शिवकॉलनी) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजता समोर आली आहे. प्रा. देशमुख यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत शारिरीक व्याधींना कंटाळून आत्महत्याच करत असल्याचे लिहिले असून पोलिसांनी ही चिठ्ठी हस्तगत केली आहे.
शिवकॉलनी येथे गट नं. 55 , प्लॉट नंर 40 याठिकाणी प्रा. किशोर देशमुख हे पत्नी कुमूदिनी यांच्यासह वास्तव्यास होते. देशमुख यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा कुणाला हा मुंबई येथे इंडियन क्लिनीकल रिसर्च येथे शिक्षण घेत आहे. तर मुलगी केतकी हिचा विवाह झाला असून ती अमेरीकेत वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी प्रा.देशमुख यांनी मुलगा कुणाल व मुलगी केतकी हिला जळगावात घरी बोलावून घेतले. सकाळी नेहमीप्रमाणे पत्नी वरच्या घरात पती प्रा.देशमुख यांना उठविण्यास गेली असता, त्यांनी साडीने गळफास घेतल्याचे आढळून आले. आरडाओरड केल्यानंतर मुलगा, मुलगी तसेच शेजारचे नागरिक धावून आले. व त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.
जुलै महिन्यात होणार होते सेवानिवृत्त
प्रा. देशमुख हे मूळ यावल तालुक्यातील नायगाव येथील आहे. भाऊ मनोज व आई हे गावाकडे राहतात. देशमुख हे 1987 साला पासून नूतन मराठा विद्यालयात प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रॉनिक विभागात कार्यरत होते. जुलै 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार अशी माहिती प्राध्यापक सहकार्यांनी दिली. अंत्यंत शांत स्वभावाचे तसेच कमी बोलणारे प्राध्यापक म्हणून देशमुख महाविद्यालयात परिचित होते. गुरुवारी त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकांसमवेत जेवणही केले. किमान कौशल्य समिती तपासणी साठी येणार असल्याचे त्यासाठी तयारी सुरु होती, या तयारीत प्रा.देशमुखही सहभागी होते असेही ते म्हणाले. मात्र सकाळी अचानक आत्महत्येच्या घटनेने प्राध्यापकांनी सुन्न झाले होते. सर्व सहकार्यांची जिल्हा रुग्णालय गाठले होते.
मी माझ्या जबाबदार्या पूर्ण करु शकत नाही…
प्रा. देशमुख यांनी मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली आहे. यात त्यांनी शारिरीक व्याधींमुळे मी अनेक दिवसांपासून त्रासलेलो आहे. त्यामुळे मी नेहमी मानसिक तणावाखाली राहिलो. आता मी माझ्या जबाबदार्या पूर्ण करु शकत नसल्याने मला नैराश्य आलेले आहे. माझा कुणाशीही वाद भांडण नाही, सर्वांनी मला सहकार्यच केलेले आहे असे लिहिले आहे. याप्रकरणी डॉ.विजय कुरकूरे यांनी रामानंदनगर पोलिसांत कळवल्यावरुन अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली तपास राजेंद्र भावसार, सतिष डोलारे करीत आहेत.