मुजफ्फरनगर । उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निवासी शाळेच्या वॉर्डनने शाळेतील 70 विद्यार्थिनींना नग्न करू त्यांच्या मासिक पाळीच्या रक्ताची तपासणी केली, असा आरोप करण्यात आला आहे. ही घटना समोर येताच संतापाची लाट उसळली आहे. सध्या या वॉर्डनला निलंबित करण्यात आलं असून, वॉर्डनची चौकशी केली जाणार आहे.
मुजफ्फरनगरमध्ये कस्तुरबा गांधी निवासी शासकीय शाळा आहे. या शाळेमध्ये 70 मुली शिक्षण घेतात. या सर्व मुलींना वॉर्डन सुरेखा तौमरने शाळेच्या खोलीत नेले आणि त्यांना नग्न अवस्थेत ठेवले तसेच त्यांची तपासणी केली. अनेक तास नग्न अवस्थेत ठेवल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात जोरदार आरडाओरडा करायला सुरुवात केली तसेच वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी केली, तर काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना बोलावलं आणि त्या त्यांच्यासोबत घरी गेल्या आहे.
यावर वॉर्डन सुरेखा म्हणाल्या की, शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त बघितल्यानं मुलींची तपासणी करण्यात आली. सर्व ठीक आहे की नाही हे पाहण्याचा मी प्रयत्न करत होते. मुलींच्या अभ्यासाबाबतीत मी नेहमी कठोर भूमिकेत असते. काही लोकांनी मिळून त्यांना माझ्याविरोधात भडकावलं आहे.
या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही याचे जोरदार पडसाद उमटले आहे. राज्य सरकारमधील मंत्री श्रीकांत शर्मा यांनी म्हटलं आहे की की हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी असणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.