संयुक्त राष्ट्र संघाचे भारत-पाकिस्तानबाबत प्रतिपादन
वॉशिंग्टन । भारत आणि पाकिस्तानमध्ये मुलींवर झालेला अत्याचाराच्या प्रकारामुळे संयुक्त राष्ट संघाने चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही देशात मुलींवर होणारा हिंसाचार सर्वच देशांना प्रभावित करतो, असे मत संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गटेर यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रसंघ दोनही देशांसोबत काम करत असून, समाजात मुली व स्त्रियांवरील हल्ल्यांविरोधात संदेश देण्यासाठी काम करत आहे, असे ते म्हणाले.
जगभरात घडताहेत महिला अत्याचाराच्या घटना
जगभरातील सर्वच देशात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. हा हिंसाचार उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम अशा सर्वच देशांमध्ये आढळून येतो. रविवारी नवी दिल्लीमध्ये एका 8 महिन्याच्या मुलावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या 28 वर्षीय चुलत भावाला अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील कसूर येथे एका 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. दोन्ही घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये गुन्हेगारांवर कारवाईची आणि मुली व महिलांचे संरक्षण करण्याची मागणी होत आहे, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
महिलांचा आदर करण्याचा संदेश देणार
संयुक्त राष्ट्रसंघ विविध देशांमध्ये मुली आणि महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात काम करत आहे. समाजात मुलींचा व महिलांचा आदर करण्याचा संदेश देण्यावरदेखील काम सुरू असून, त्यासाठी अनेक उपक्रमांची आखणी केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा प्रश्न आरोग्य, शिक्षण यात महिला व मुलींना समान अधिकार देण्याशी संबंधितदेखील आहे. महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ अनेक विकास कार्यक्रमांतून प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.