बोदवड : मुक्ताईनगर विधानसभेच्या निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यानंतर तो पराभव माजी मंत्री खडसे अद्यापही पचवू शकले नाही त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेतून ते आपल्यावर बेछूट आरोप करीत असल्याचा दावा आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परीषदेत शुक्रवारी सायंकाळी केला. बोदवड येथे राष्ट्रवादीच्या बैठकीत एका नाजूक प्रकरणात आमदारांवर खडसेंनी तोफ डागल्याने या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आमदार पाटील यांनी पत्रकार परीषद घेतली.
आमदार झालो म्हणून पोटशूळ उठणे अयोग्य
आमदार पाटील म्हणाले की, खडसेंसारख्या ज्येष्ठ मंत्री राहून चुकलेल्या नेत्याने अंजली दमानियांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते शिवाय महिलेच्या हत्येप्रकरणी त्यांच्या भाच्याला अटक झाली असून त्या विषयी खडसे काहीही बोलत नाही मात्र सर्वसामान्य कुटुंबातील मतदारसंघाचा माणुस आमदार होतो याचा पोटशूळ खडसेंना उठणे ही बाब आश्चर्यकारक आहेे. मी आजवर एकनाथ खडसे, रोहिणीताई, रक्षाताई यांचा आदरच केला आहे. त्यांच्याबाबत वैयक्तिक असे कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही, असेही ते म्हणाले. माझ्यावर वैयक्तिक खालच्या पातळीची टीका करणे खडसेंनी बंद करावे ते ज्येष्ठ असल्याने त्यांनी त्या पद्धत्तीने वागावे, असा सल्लाही आमदारांनी दिला. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, नगराध्यक्ष पती सईद बागवान, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक सलीम कुरेशी, आनंदा पाटील, इरफान शेख, संजय गायकवाड, तालुका प्रमुख गजानन खोडके, दीपक माळी, हर्षल बडगुजर, अमोल व्यवहारे, शांताराम कोळी, कलिम शेख, मनोज पाटील, परेष अग्रवाल आदी उपस्थित होते.