विधायक कामासाठी दिले 25 हजार रुपये
भोसरी : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांची कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी मोठी परवड होत असते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेचे युवक सेल प्रदेशाध्यक्ष तथा कुंभारगावाचे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत उद्धवराव गायकवाड यांनी आपल्या मुलीचा दुसरा वाढदिवस साजरा न करता 25 हजार रुपयांची रोख मदत भोसरीतील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचा सांभाळ करणार्या ‘स्नेहन’ या संस्थेस केली. गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद
मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. लिंग गुणोत्तराचा दोलायमान झालेला आखेल लक्षात घेता, सरकारकडून ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी साद घालून प्रबोधन केले जात आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यात सर्व यंत्रणा अपयशी ठरत आहे. अशी विचित्र मानसिकता आज समाजाची बनलेली असताना आपल्या घरात कन्यारत्न जन्मास आले, याचा अभिमान काही व्यक्तींनाच होतो. त्यापैकीच एक असलेले गायकवाड कुटुंबीय. अनिकेत गायकवाड यांनी आपल्या मुलीचा दुसरा वाढदिवस गतवर्षी प्रमाणेच वेगळ्या प्रद्धतीने साजरा करण्याचे ठरवून तो निर्णय अमलातही आणला.
साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा
मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचा सांभाळ करणार्या भोसरीतील ‘स्नेहन’ या संस्थेला 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या रकमेतून किराणा माल व संस्थेकरिता लागणारे इतर साहित्य खरेदी करण्यात आले. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक पालक आपल्या पाल्याचाच विचार करून मोठ्या हौशेने त्याचा वाढदिवस साजरा करतात. त्यासाठी अमाप खर्च करतात. मात्र, मोजकेच पालक समाजाचे भान असणारे, समाजासाठी दान करणारे असतात. अनिकेत गायकवाड हे त्यापैकीच एक आहेत.