चोपडा : ग्रामीण जीवनाचा कणा शेती आणि शेतकरी असून दोघांचीही स्थिती सध्या दयनीय आहे. ग्रामीण भागातील माता-पिता मुलीच्या लग्नाच्या चिंतेने ग्रासलेले असतात. त्यामुळे ग्रामीण जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतकरी आणि मुलींच्या माता-पित्यांना सन्मान मिळाल्यास ग्रामीण जीवनाच्या 70 टक्के समस्या सुटतील, असे प्रतिपादन कवी प्रकाश किनगावकर यांनी केले. येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात ’पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे , संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन मुख्याध्यापक एस. डी. चौधरी हे उपस्थित होते.
कवीचे स्थान महत्वाचे
कवी प्रकाश किनगावकर यांनी लहानपणापासून आपली शेतीवर निष्ठा असल्याचे सांगत नोकरीसोबत कवितेचा छंद जोपासल्याचे सांगितले. तसेच दहावीच्या पाठ्यपुस्तकातील ’वारस’ कवितेचा जन्म कसा झाला? याचीही कथा सांगितली. यावेळी मुलींसाठी एक खास कविताही त्यांनी ऐकवली. याप्रसंगी ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे यांनी ’पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थी जीवनात कवीचे स्थान महत्वाचे असल्याचे सांगितले.
अभ्यासक्रमात समावेश
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश झाल्याबद्दल चोपड्याचे कवी अशोक निळकंठ सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन व प्रास्ताविक मराठी विषय शिक्षक एस. बी. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक एस. डी. चौधरी यांनी आभार मानले.