मुलीच्या विवाहादिवशी वृक्ष लावण्याचा संकल्प

0

सुलतानपुरातील ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
शहादा :
दरवर्षी सामाजिक वनीकरण विभागातर्फे लाखो वृक्ष लागवडीचे अभियान राबवले जाते. पण प्रत्यक्षात त्यातील किती वृक्ष जगतात, हा एक संशोधनाचा विषय ठरु शकतो. याला अपवाद ठरवित मात्र, शहादा तालुक्यातील सुलतानपूर गावातील ग्रामस्थांनी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील मुलीचा विवाह झाला की, तिची आठवण म्हणून एक वृक्ष लावून त्याचे संगोपन मुलीप्रमाणे करून वाढवायचे. या निर्णयाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक समाजात कुटुंबात होणार्‍या मुला-मुलींच्या विवाहानिमित्त एक झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील सुलतानपूर येथे राधिका विश्वास पाटील हिच्या विवाहानिमित्त ‘लेक चालली सासरला’ ही आठवण रहावी म्हणून त्यानिमित्त एक वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निर्णय तिचे काका व काकू यांनी घेतला आहे. यानंतर गावात कुठल्याही समाजात मुलगा व मुलीचे विवाह होत असेल त्या विवाहाच्या दोन दिवसा अगोदर गावाच्या हद्दीला लागून किंवा घरासमोर एक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प सुलतानपूर ग्रामस्थांनी केला आहे.

वनविभागाकडून प्रतिवर्षी लाखो वृक्ष लागवड केली जाते. परंतु त्याचे संगोपन होत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. दरवर्षी लाखो झाडांची लागवड होते. मग दोन चार वर्षातच दाट जंगल झाले असते. आज जी भीषण पाणीटंचाई आहे. त्याची वेळ आली नसती. झाडे लावणे सोपे पण त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. सुलतानपूर ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आदर्श ठरणारा आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर’ या कवितेच्या ओळी आपल्याला गावोगावी वृक्ष लागवडीचे आवाहन देत आहेत.

आज वृक्षांची मोठ्या प्रमाणात झालेल्या कत्तलीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. अशा यास्थितीत सुलतानपूर तालुका शहादा येथील प्रभाकर दौलत पाटील व त्यांच्या पत्नी सुनिता प्रभाकर पाटील या शेतकरी कुटुंबातील त्यांची पुतणी राधिका विश्वास पाटील हिचा शुभविवाह आहे. राधिका पाटील यांचे आई-वडील बालपणीच निधन झाल्याने तिचे संगोपन काका आणि काकू यांनी केले. मुलीच्या शुभविवाह झाल्यानंतर ती सासरी जाणार आहे. तिची कायमस्वरूपी आठवण रहावी, म्हणून एक झाड वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी डॉक्टर किशोर पाटील, प्रकाश पाटील, अंतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, किशोर मोरे, हिरालाल मोरे, दिलीप पाटील, छोटेलाल पाटील, संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.