मुलीला जन्म देणार्‍या आईचा सत्कार

0

महिलादिनानिमित्त सन्मान स्त्री जन्माचा

चिंचवड : येथील प्रयास ग्रुपच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवजात मुलीचे स्वागत व त्याच बरोबर मुलीला जन्म देणार्‍या आईचा सत्कार हा आगळा वेगळा उपक्रम कामत हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आला होता. ग्रुपतर्फे एकूण 25 नवजात मुली व जन्म देणार्‍या माता यांचा नवीन पोषाख, स्त्री संरक्षण व स्त्री जन्म स्वागत या आशयांचे शुभेच्छापर सामाजिक संदेश देणारे भेटकार्ड, गुलाबपुष्प व मातेला आवश्यक असणारे पोष्टिक आहार यांचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

घरा-घरात जनजागृती होणे गरजेचे
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे या उपस्थित होत्या. चिंचवडे म्हणाल्या की, स्त्री-भू्रण हत्या रोखणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. यासाठी समाजात, घरा-घरात जनजागृती होण्याची गरज आहे. मुलगा पाहीजे या ह÷ट्टापायी आपण कितीतरी मुलींना मारून टाकतो, याची कल्पनाच नसते. मुलगा पाहिजे पण या मुलाला जन्म देणारी मुलगी नको ही लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. या उद्देशाने प्रयास ग्रुपने हा उपक्रम राबविला याचा मला अभिमान वाटतो. त्यांनी आपले हे काम असेच पुढे चालू द्यावे, अशा त्यांना शुभेच्छा.

स्त्रीला मानाचे स्थान मिळावे
प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ म्हणाल्या की, स्त्री ही एक सामाजिक महत्त्वाचा घटक असतो. समाजात तिला मानाचे स्थान दिले जावे व तिची निर्मिती समाजबांधणीस उपयुक्त असते. अनेकदा महिलाच स्त्री-जन्माच्या विरूद्ध असते. मुलगा पाहिजे असतो, या विचाराने त्या मुलीला जन्म घेऊ देत नाहीत. ही महिला कधी सासू असते, कधी स्वतः आईच असते. ही मानसिकता बददली तर आज मोठे नुकसान टळेल. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी घरातील पुरूष मंडळींनी देखील कडाडून विरोध केला पाहिजे. तरच मुली सुखाने जन्म घेतील.

याप्रसंगी कामत हॉस्पिटलचे डॉ. दिलीप कामत यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्तविक आशा पुरकर यांनी केले. तर जयश्री उदास यांनी आभार प्रदर्शन केले. प्रयास ग्रुपच्या माधुरी कवी, शैला टोणपे, विद्या क्षीरसागर, गीतांजली बावळे, दिपाली मिरजकर, अनिता पाठक, प्रणिता कुलकर्णी, दिपाली खासनीस आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.