रत्नागिरी । आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणार्या नराधम पित्याला माणगाव सत्र न्याययालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. जगन्नाथ वाघरे असे या नराधमाचे नाव असून तो तळा तालुक्यातील भानंग गावचा रहिवासी आहे आरोपी जगन्नाथ वाघरे पत्नी व मुलीसह घरात असताना ऑगस्ट 2015 मध्ये रात्री आपल्याच अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करीत तिला कुणालाही सांगू नको. अशी धमकी दिली. सदर मुलीने दुसर्या दिवशी घडलेली हकीकत आईला सांगितली असता, आईने मुलीला सांगितले की तू शाळेत जा मी वडिलांना बोलते. परंतु नराधम बापाला सवय लागल्याने तो 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत राहिला. आरोपीच्या पत्नीने जाब विचारल्यावर त्याने पत्नीला व मुलीला मारहाण केली.
गर्भपातासाठी दाखल करुन पळून गेला
वारंवार लैंगिक संबंध आल्याने अल्पवयीन पिडित मुलीला गर्भधारणा झाली वडिलांनी गर्भपातासाठी मुंबई येथे कामा हॉस्पिटलला तिला दाखल केले व तो पळून गेला. पिडीत मुलीने आझाद नगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर तळा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी.एन.चौधरी यांनी पित्याला गजाआड केले होते.
सहा साक्षीदारांच्या साक्षी
अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले. सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांमध्ये पिडीत मुलगी व तिच्या आईने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. त्यांची व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश रा.ना.सरदेसाई यांनी आरोपी जगन्नाथ वाघरेला आजन्म कारावास व पोक्सो कायद्यान्वये 10 वर्षे सक्तमजुरीची व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.