मुलुंड येथील देवकुंज रुग्णालयात अल्पदरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया

0

मुंबई । मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे आणि नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे, या संज्ञेचा खराखुरा वापर मुलुंड येथील देवकुंज हॉस्पिटलमध्ये पाहावयास मिळतो. या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोतीबिंदू व डोळ्यांच्या इतर शस्त्रकिया अल्पदरात केल्या जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा 20 मार्च ते 19 एप्रिल रोजी देवकुंज हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सन 2005मध्ये डॉक्टर शांतीलाल शहा यांनी हॉस्पिटलची स्थापना केली. त्यांनी स्वत: मुलुंड पश्‍चिम येथील त्यांच्या मालकीची जागा या हॉस्पिटलकरता दिली आहे.

मुलुंडच्या गणेश गावडे मार्गावर हे हॉस्पिटल बांधण्यात आलेले आहे. हॉस्पिटलच्या उभारणीच्या कामाकरिता त्यांची पत्नी डॉक्टर कुसुम शाह यांनी जनवर्गणी काढून आणि स्वतःचे दागिने विकून हॉस्पिटल उभारलेले आहे सध्या त्यांचा मुलगा डॉक्टर अभय शहा हे मोफत हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत तर त्यांची पत्नी माधुरी अभय शाह या रुग्णालयाच्या विश्‍वस्त पदावर आहेत. हे दोघेही त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास झटताहेत. हॉस्पिटलमध्ये डीसीआर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. इंडियन, इम्पॉर्टंट, पीआरओ टेबल आणि मल्टी फोकल लेन्स बसवले जातात. अवघ्या दीड ते दोन तासात पेशंटवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात येते.