मुले शिकणार की रेल्वे बघणार?

0

संतप्त पालकांचा सवाल

चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिंचवड परिसरामध्ये प्रेमलोक पार्क येथे महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या इमारतीत प्रस्तावित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय होणार आहे. त्यामुळे महात्मा फुले शाळा दळवी नगर येथे हलविण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. दळवीनगर येथील शाळेच्या इमारती जवळून रेल्वेमार्ग जातो आहे. दिवसभर येथे रेल्वे गाड्यांचा आवाज येत असतो. त्यामुळे विद्यार्थी शिकणार की रेल्वे बघणार, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रेमलोक पार्क येथील शाळा स्थलांतरित करू नये या मागणीसाठी आज (बुधवारी) विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या आवारात ठिय्या मांडला होता. विद्यार्थ्यांचे कल्याण करायचे असेल तर ही शाळा हलवू नये, अशी मागणी पालक आणि सामाजिक संस्थांकडून होत आहे. दळवीनगर येथील नियोजित जागा रद्द करावी, यासाठी पालकांकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न
महापालिका देत असलेल्या नव्या जागेमध्ये अनेक नको अनेक गोष्टी आहेत. दळवी नगर येथील शाळेसमोर विद्युत रोहित्र (डीपी) आहे. बाजूला मोठा नाला आहे. सार्वजनिक शौचालय आहे. समोर रेल्वे रूळ आहे. तसेच ही लोकवस्ती असुरक्षित आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथे स्थलांतरित केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रेमलोक पार्क हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही बाधा येणार नाही. सध्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सुमारे 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांच्या भविष्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पालकांना सूचना नाही
येत्या शुक्रवार (दि. 15) पासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेकडून शाळा स्थलांतरित केल्याची कोणत्याही प्रकारची सूचना अद्याप पालकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती उत्पन्न झाली आहे. पोलीस आयुक्तालयास आमचा विरोध नाही, पण आयुक्तालयाचे मुख्यालय इथेच होणार का, असाही प्रश्‍न पालकांना पडला आहे. या शाळेसाठी पालकांना सुरुवातीपासून संघर्ष करावा लागत आहे. ही शाळा यापूर्वी चिंचवड गावात चापेकर वाड्यात सुरू होती, मात्र त्याठिकाणी शाळेसाठी पुरेशा वर्गखोल्या नसल्याने पालकांनी सातत्याने मागणी करून ही शाळा प्रेमलोक पार्क येथे 2014 साली स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार पालकांना संघर्ष करायला न लावता, पालकांनी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा.

आज सकाळपासून पालक आणि विद्यार्थी शाळेच्या समोर बसले आहेत. सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांनी काहीही खाल्ले नसल्याने त्यांनी शाळेसमोरच चूल देखील पेटविली. यावरून पालकांचा शाळा स्थलांतराला तीव्र विरोध असल्याचे दिसून येते. या संदर्भात सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित असून लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.