आकुर्डी : वेळ सकाळी साडेआठची…आकुर्डी येथील एका शाळेत प्राथमिक वर्गात शिकणारी चार मुले अचानक वर्गात न बसताच शाळेबाहेर निघून गेली. शाळा प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली. मात्र, 10 ते 11 वयोगटातील ही मुले अशी अचानक गेल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. बसचालक, शिक्षक आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा सामितीच्या कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर अकराच्या सुमारास ही मुले प्राधिकरण सेक्टर 28 येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाजवळ सापडली..आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
याप्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालक आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक आहे. मुले हरवणे किंवा निघून जाणे याबाबत सर्व शालेय तसेच शासकीय प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे. तसेच याबाबत विशेष प्रबोधन आणि दक्षता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.