पिंपरी-चिंचवड : अभियांत्रिकीतील तंत्रज्ञान विकासामुळे फायदे होतात तसेच तोटे देखील होतात. हे तंत्रज्ञान योग्य व्यक्तींच्या हाती गेले, तर समाजाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लागेल. मात्र विकृत विचारांच्या व्यक्तींकडून याचा गैरवापर होऊ शकतो. प्रसन्न मन आणि सुदृढ शरीराच्या माध्यमातून उत्तम चारित्र्याचे नागरिक घडविणे मुल्याधिष्ठीत शिक्षण पध्दतीला अभिप्रेत आहेत. अशी मुल्याधिष्ठीत शिक्षणपध्दती रुजविण्यासाठी सर्व शिक्षण संस्थानी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची हजेरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयईईई आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पीसीसीओई) यांच्या वतीने ‘टेक्नोव्हीजन इंडिया 2035’ प्रकल्पाअंतर्गत कॉम्प्युटींग, कम्युनिकेशन, कंट्रोल अँण्ड ऑटोमेशन (आयसीसीयुबीईए) तिसर्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. करमळकर यांच्या हस्ते गुरुवारी निगडी येथे करण्यात आले. यावेळी भारत, रशिया, युके, जपान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमधील उद्योग व शिक्षण संस्थांचे तज्ञ आणि पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, संगणक तज्ञ डॉ. दिपक शिकारपूर, आयईईई पुणे विभागाचे उपाध्यक्ष एम.जे. खुर्जेकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, डॉ. सुदीप थेपाडे, सीडॅक मुंबईच्या सहसंचालीका डॉ. पद्मजी जोशी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, आयईईई पुणे विभागाचे समन्वयक गिरीष खिल्लारी, डॉ. सोनाली पाटील आदी उपस्थित होते.
शिक्षण पद्धती अक्षम
शिकारपूर म्हणाले, जागतिक आव्हानांना सामोरे जाताना अभियंत्यांनी बहुशाखीय ज्ञान आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याची भारतीय शिक्षण पध्दती येणार्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम नाही. यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी इंडियन टॅलेंन्ट व इनोव्हेशन अँड टेक्नोलॉजी व इंडिया टुमारो या त्रिसुत्रीव्दारे विकास व रोजगारांचे ध्येय साध्य करावे.
‘संधी व आव्हाने’वर मार्गदर्शन
प्राचार्य फुलंबरकर यांनी स्वागतपर भाषणात ‘इंडिया टेक्नोव्हीजन 2035 ’याविषयावर मार्गदर्शन केले. मुंबई सीडॅकच्या सहसंचालिका डॉ. पद्मजा जोशी यांनी ‘ई-गव्हर्नन्स डेव्हलपमेंट मधील संधी व आव्हाने’ याविषयी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकीमधील नवनिर्मिती व संशोधनाला पीसीईटी संस्था नेहमीच हातभार लावते, असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. डॉ. सुदीप थेपाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनाली पाटील यांनी आभार मानले.