मुळशीत पावसाची दमदार हजेरी

0

मुळशी । मुळशीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे व तलावसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. तालुक्यात चालू वर्षीच्या हंगामात आतापर्यंत एकूण सरासरी जवळपास 1100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अर्ध्या तालुक्याला पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी पुरविणारे मुळशी धरण 70.10 टक्के भरले आहे.

धरणाची पातळी सध्या 62.02 मीटर एवढी असून, धरणसाठा 366.45 दलघमी एवढा झाला आहे. धरण भागात पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर येत्या दोन-चार दिवसांत ते 80 टक्के भरण्याचा अंदाज टाटा पॉवर कंपनीने प्रशासनाला कळविला आहे. धरण 80 टक्के भरल्यास या धरणाच्या पाचही दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येईल, असेही कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

वीजपुरवठा खंडित
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असून, त्यामुळे पिण्याचे पाणी पुरविणे ग्रामपंचायतींना कठीण झाले आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिरंगुट एमआयडीसीतील अनेक कंपन्या व उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते जलमय झाले असून, बर्‍याच रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

पूरपातळी रेषेच्या आत न फिरण्याची सूचना
पावसाचा जोर कायम असल्याने मुळशी धरण केव्हाही 80 टक्के भरू शकते. धरण भरल्याबरोबर तत्काळ धरणाचे दरवाजे उघडले जातील. यानंतर मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. मागील वर्षी अचानक झालेल्या पावसाने धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांना याचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी धरण भिंतीवरून दरवाजे उघडल्याची धोक्याची घंटा वाजण्यापूर्वीच आपली गुरे, शेती अवजारे व अन्य वस्तू सुरक्षित जागी नेऊन ठेवावीत तसेच या कालावधीत नदीच्या पूरपातळी रेषेच्या आतील परिसरात फिरू नये, अशा सूचना मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केल्या आहेत.