मुळशीत विजेचा लपंडाव

0

मुळशी । मुळशी तालुक्यात सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. विजेचा लपंडावामुळे मुळशीकर त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात वीज गायब होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
चार दिवसांपासून वारंवार वीज गायब होत आहे. रात्री-अपरात्री कधीही वीज गायब होते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे सतत वीज गायब होते. त्यामुळे उत्सव साजरा करताना अनेक अडथळे येतात. पिरंगुट, लवळे, भूगाव, भुकुम, कासारआंबोली, भरे, उरावडे, घोटावडे, अंबडवेट, शिंदेवाडी, सुतारवाडी या गावांमध्ये आणि गावांच्या आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवर तसेच तालुक्याच्या इतर भागात अनेकदा तास्नतास वीज गायब होते. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पिरंगुट गाव हे मुळशी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीची पंढरी आहे. आजूबाजूच्या परिसरातील गावामध्ये अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. बहुतांशी सर्व कारखाने हे येथील विजेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे विजेच्या लपंडावामुळे याचा मोठा आर्थिक व मानसिक फटका कारखान्यांना व त्यामधील काम करणार्‍या कामगारांना बसत आहे.