मुळशी । मुळशी तालुक्यातील वीस गावे आणि त्यांच्या वाड्यावस्त्यांमधील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय करणार्या मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची सप्टेंबर अखेरपर्यंतची 1 कोटी 31 लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. केवळ कोंढावळे आणि खुबवली ग्रामपंचायतीने आतापर्यंत पाणीपट्टी भरली असून उर्वरीत 18 गावांच्या थकीत पाणीपट्टीचा आकडा लाखाच्या घरात पोहचला आहे. थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे एक जानेवारीपासून गावचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ
मुळशी धरणावर उभारलेल्या या योजनेतून तालुक्यातील पुणे-पौड रस्त्यावरील पिरंगुटपर्यंत 20 गावे व त्यांच्या वाड्यावस्त्यांना या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपट्टीचे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात ग्रामंपचायतींना बिल दिले जाते. परंतू काही ठिकाणी ग्रामस्थ पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे थकीत बिले वाढत जातात. सप्टेंबरमध्ये पिरंगुट ग्रामपंचायतीने 5 लाख रूपये पाणीपट्टी भरली. पौड, चाले, दारवली या ग्रामपंचायतींनीही प्रत्येकी 2 लाख रुपयांचा भरणा केला. अंबडवेटने 1 लाख, जामगावने 50 हजार, दखण्याने 25 हजार आणि अकोल्याने 1 हजार 590 रुपयांची बिले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भरली आहेत.
माले (1 लाख 5 हजार 885), संभवे (2 लाख 58 हजार 392), जामगाव-दिसली (3 लाख 85 हजार 110), अकोले (70 हजार 70), पौड, विठ्ठलवाडी (46 लाख 39 हजार 996), भादस, शिळेश्वर (9 लाख 84 हजार 562), असदे (4 लाख 41 हजार 558), रावडे, हुलावळेवाडी (1 लाख 47 हजार 387), दखणे (2 लाख 86 हजार 005), चाले (सावरगाव व करमोळी) (7 लाख 84 हजार 87), दारवली (2 लाख 77 हजार 101), मुगावडे (2 लाख 84 हजार 57), अंबडवेट (3 लाख 54 हजार 177), भरे (66 हजार 644), पिरंगुट (27 लाख 74 हजार 901) शेरे (1 लाख 52 हजार 525), कासारआंबोली (6 लाख 16 हजार 629), घोटावडे (7 लाख 76 हजार 295).