पुणे- ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा पाहतांना पुण्याच्या मंगला थिएटरमधून कोल्हापूरातील एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. थिएटरच्या स्क्रीन नंबर ३ मध्ये मुळशी पॅटर्न सिनेमाचा सुरु असतांना पोलिसांनी अटक केली. चित्रपटाचा खेळ थांबवून लाईट सुरु केल्या व मॅनेजरच्या मदतीने त्या गुंडाला ताब्यात घेतले.
उमेश भाऊसाहेब अरबाळे (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कोल्हापूर इंचलकरंजीचा राहणारा आहे. हत्या, दरोडा, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. शनिवारी रात्री कोल्हापूर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना संशयित गुन्हेगार शहरामध्ये असल्याची माहिती दिली.
हर्षवर्धन ठाकूरदेसाई यांच्या हत्या प्रकरणात उमेश भाऊसाहेब अरबाळे तिसरा गुन्हेगार आहे. ११ डिसेंबरला सहा जणांनी मिळून ठाकूरदेसाई यांची हत्या केली. उमेशही त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता. हत्या केल्यानंतर पुण्यामध्ये लपून बसला होता. चित्रपटगृहावर धाड टाकून अशा प्रकारे अटकेच्या केलेल्या कारवाईमुळे चित्रपट पाहणाऱ्या अन्य प्रेक्षकांना त्रास झाला नाही. काही मिनिटांमध्ये आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस बाहेर निघाले असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.