मुळा आणि पवना या नदी पात्रात थेट मैलामिश्रित पाणी

0

पिंपळे गुरव स्मशानभूमी, जवळकरनगर, वैदुवस्ती परिसर, औंध गावाचे सांडपाणी थेट नदीत

सांगवी (महादेव मासाळ ) : एकीकडे गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच सांगवी परिसरातून वाहणार्‍या मुळा आणि पवना या नद्या पात्रात थेट सोडण्यात येत असलेल्या मैला पाण्यामुळे प्रदूषित झालेल्या आहेत. पिंपळे गुरव मधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज फुटल्याने पिंपळे गुरवमधील संपूर्ण जवळकरनगर, वैदुवस्ती परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. तसेच जुनी सांगवीतील शितोळे पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूला पुणे महापालिकेच्या हद्दीत संपूर्ण औंध गावाचे सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात येत असूनही पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याची परिस्थिती आहे. चेंबर दुरुस्त करून नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ड्रेनेज लाईन फुटल्याचा परिणाम
अलिकडच्या काळात पवना, मुळा या नद्या अतिप्रदुषित झाल्या आहेत. दूषित पाण्याचे लोटच्या लोट नदीत सोडले जात आहेत. या दूषित पाण्यामुळे नदीतील मासे तर केव्हाच गायब झाले आहेत. नदी काठावरील पिंपळे गुरव, सांगवी सारख्या उपनगरांना याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. पिंपळे गुरवमधील प्रभाग 29 हा सुमारे 60-65 हजार लोकसंख्येचा प्रभाग आहे. प्रभागातील मैलापाणी दापोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात जात असते. त्यासाठी लाखो रुपये खर्चून स्वतंत्र ड्रेनेज लाईनही टाकण्यात आली आहे. मात्र, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे पिंपळे गुरवमध्ये निर्माण होणारे मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. परिणामी मैलापाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र मैलापाण्यामुळे दूषित झाले. नदीपात्रातील पाणी पहाण्यायोग्यही राहिलेले नाही. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जुनी सांगवी परिसरात दुर्गंधी
मुळा नदीपात्राचीही वेगळी परिस्थिती नाही. पिंपळे निलखपर्यंत स्वच्छ असणारे नदीपात्र सांगवी नजीक प्रदूषणामुळे बरबटून गेले आहे. संपूर्ण औंधचे पाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन सांगवीजवळ फुटल्याने गेल्या कित्येक महिन्यापासून संपूर्ण मैलापाणी नदीपात्रात जात आहे. बोपोडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात या पाईपलाईनमधून मैलापाण्याचा एक थेंबही जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी नदीपात्रात जात असूनही पुणे महापालिका प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे. या मैलापाण्यामुळे संपूर्ण मुळापात्र दुषित झाले. नदीपात्रातील पाणी पाहण्यायोग्यही राहिलेले नाही. यामुळे जुनी सांगवी परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुळा नदीपात्रात येणारे हे मैलापाणी रोखण्याची मागणी जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवकांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. अशी कामे तातडीची असतात. ती नाही केली तर त्याचा जनसामान्यांवर विपरीत परिणाम होत असतो. गेल्या काही महिन्यापूर्वीच या ड्रेनेज लाईनचे काम केले आहे. तरीही निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली आहे. याचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात येणारे मैलापाणी लवकरात लवकर रोखण्यात यावे.
– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक