मुळा कालवा फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप

0

पुणे-सारसबागेकडून दांडेकरपुलाच्या दिशेने जाताना सिंहगड रस्त्यावर जनता वसाहत जवळून जाणारा मुळा कालवा आज अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागले. पाण्याचा वेग जास्त असल्याने चारचाकी आणि दुचाक्यांचे नुकसान झाले आहे. येथील रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले असून जवळील आंबील ओढा वसाहतीमध्ये पाणी घुसून रहिवाशांचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याठिकाणी बघ्यांची खूप गर्दी झाली आहे. या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान पाण्याचा प्रवाह वाढत असून दोरीच्या साहाय्याने घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे वरून पाणी बंद केले असले तरीही अंतर खूप असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्यास वेळ जाणार आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे.

घरातून पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेल्या अनेक वस्तू, गॅस सिलिंडर डेक्कन जवळील नदीपात्रात वाहून येत आहेत. या घटनेमुळे अलका चौक, स्वारगेट टिळकरस्ता, बाजीराव रस्तावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.