मुळा-मुठा नदीतून होणार जलप्रवास!

0

पुणे । शहराच्या भविष्याच्या दृष्टीने नवनवीन वाहतुकीचे पर्याय देणे आवश्यक आहे. तसेच दिवसेंदिवस बिकट होणार्‍या वाहतूक कोंडीचे संकट दूर करण्यासाठी मुळा-मुठा नदीतून जलमार्ग करण्याचा खासदार अनिल शिरोळ यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे पाठविला आहे. आगामी काळात केंद्रात त्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल भूमिपूजनाच्यावेळी पुण्यातील वाहतुकीच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. रेल्वेने प्रवास करताना 1 रुपया, रस्त्यावर 50 पैसे तर, जलमार्गाने केवळ 25 पैसे खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार मुळा-मुठा नदीतून जलमार्ग होण्यासाठी राज्याकडून प्रस्ताव येणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.

सिस्टर सिटी बनविण्याचे प्रयत्न
केंद्र शासनातर्फे 10 नद्यांमधून जलमार्ग करण्यात येणार आहे. पुण्याचाही त्यात समावेश व्हावा, यासाठी शिरोळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे शहराची लोकसंख्या जवळपास 40 लाख आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. सध्या मेट्रोचे कामही जोरात सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी जलमार्ग गरजेचे असल्याचे शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. न्यूयॉर्कमध्ये कचरा आणि वाहतुकीची फारशी समस्या नाही. त्या शहरात चांगले काम सुरू आहे. या शहराप्रमाणेच पुणे देखील औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळेच पुणे-न्यूयॉर्क आणि पुणे-बोस्टन या शहरांना जुळी शहरे (सिस्टर सिटी) बनविण्यासाठी सहकार्य करण्यासाठी संदीप चक्रवर्ती यांना आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही शहरांच्या प्रतिनिधी मंडळांना पुणे भेटीचे आमंत्रण दिल्याचे शिरोळे यांनी सांगितले.