मुळा-मुठा-भीमा नदीच्या पात्रात जलपर्णीचा विळखा

0

काठावरील गावांना दुषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांचा धोका

शिरूर : रांजणगाव सांडस येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या रांजणगाव सांडसवाळकी संगम बेट या परिसराला नदीत पाण्याची वाढ होताच मुळा-मुठा-भीमा नदीच्या पात्रात जलपर्णीने विळखा घातला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हे पाणी नदी पात्रात आले आणि वाहून गेले. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी पारगाव येथील बंधार्‍याला प्लेट टाकण्यात आल्या होत्या. प्लेट टाकल्यानंतर 15 दिवसांनंतर भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पात्रात पाणी पातळीत वाढ झाली. वाहणार्‍या पाण्याचा प्रवाह अडविला गेल्यामुळे पाणी पात्रात स्थिर झाले. पुणे महापालिका, पिंपरीचिंचवड महापालिकांचे मैलामिश्रीत पाणी आणि याच भागातील औद्योगिक वसाहतींमधील केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता नदीच्या पात्रात सोडले जाते आहे, त्यामुळे या पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनिक तवंग साचल्याने जलपर्णीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक पाण्यात मिसळून जलपर्णीची वाढ झपाट्याने होत आहे. या जलपर्णीमुळे अनेक शेतकर्‍यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वीज पंपाच्या बॉलला अडकलेली जलपर्णी काढण्यासाठी शेतकरी नदीच्या पात्रात रात्री-अपरात्री उतरतात, अशावेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जलपर्णीमुळे वीज पंपाने उपसा सिंचन योजना राबवून शेतकरी वर्गाने शेतीला पाणी पुरवठा केला आहे; परंतु या पाण्याचा शेतात भला मोठा फेस तयार होत आहे. अनेक गावांना पाणी शुद्धीकरण प्रकल्प शासकीय स्तरावर बसविण्यात आले आहेत; पण येथील अशुद्ध पाणी पाळीव जनावरेही नदीचे पाणी पीत नाहीत तर जलपर्णीमुळे अनेक जीवजंतू मरण पावत आहेत. दौंड आणि शिरूर तालुकाच्या लोकप्रतिनिधींनी नदी काठावरील गावांच्या जलपर्णीच्या समस्येचा शासनाकडे पाठपुरावा करून त्यांना होणार्‍या जलपर्णीच्या त्रासातून सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार महेश बापू ढमढेरे यांनी सांगितले.

गावांना आजाराचा विळखा

भीमा नदीच्या काठावरील शिरूर तालुक्यातील राक्षे वाडी, रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटे, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तर दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील कानगाव, नानगाव, पारगाव, तर मुळा मुठा नदीच्या काठावरील देलवडी, पिंपळगाव राहू, या नदीच्या काठावरील गावांतील नागरिकांना पाण्याच्या दुर्गंधीमुळे आणि जलपर्णीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. किडनी स्टोन, कावीळ, अंगावर पुरळ येणे यांसारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. यासाठी ताबडतोब या जलपर्णी काढून टाकाव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.