मुळा-मुठेचे प्रदूषण; शहर परिसरातील 49 कंपन्या बंद!

0

पुणे : पर्यावरणाची हानी करणार्‍या तसेच, प्रदूषण रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या पुणे औद्योगिक परिसरातील सुमारे 49 कंपन्यांना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाळे ठोकलेले आहे. त्या बहुसंख्य रसायनिक व औषधीनिर्माण कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली. गेल्या दोन वर्षात मंडळाने ही कारवाई केली असून, या कंपन्या त्यांचे प्रदूषित व जैवविविधतेच घातक असे रसायनेमिश्रित पाणी मुळा व मुठा नद्यांच्या पात्रात सोडत असल्याचे दिसून आले होते. प्रदूषण मंडळाने या दोन्ही नद्यांची वेळोवेळी अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानुसार, सुरुवातीला संबंधित कंपन्यांना जल व वायू प्रदूषणास दोषी धरून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतरही समाधानकारक खुलासा न आल्याने त्यांच्यावर कंपनीबंदची कारवाई करण्यात आली, असेही अधिकारी सूत्राने सांगितले.

वॉच डॉग फाउंडेशनला मिळाली आरटीआयअंतर्गत माहिती
मुंबईस्थित वॉच डॉग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहिती अधिकारात माहिती मागितली होती. या माहितीतून कारवाईची बाब उघडकीस झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी सांगितले, की ज्या कंपन्यांनी पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे, त्या कंपन्यांना तातडीने उत्पादन बंद करण्यास सांगण्यात आले आहे. प्रदूषणाच्या गंभीर तक्रारीनंतर या कंपन्या बंदही करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण सर्वात कमी आहे. एकूण 315 नद्यांपैकी केवळ 49 नद्यांबाबतच प्रदूषणाच्या तक्रारी आलेल्या आहेत. अलिकडे जारी झालेल्या अहवालानुसार, सुमारे तीन हजार दशलक्ष अप्रक्रियायुक्त सांडपाणी नद्या, तलाव किंवा सरोवरात सोडले जात असल्याचेही या अहवालात नमूद आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार असल्याचेही अन्बलगन यांनी सांगितले. देशात एकूण निर्माण होणार्‍या सांडपाण्यापैकी महाराष्ट्रात 13 टक्के सांडपाणी निर्माण होते. दररोज सरासरी 8143 दशलक्ष लीटर पाणी एवढी ही संख्या आहे, पैकी 5160 दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया होते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

अनेक कंपन्यांचे इटीपी सदोष!
वॉच डॉग फाउंडेशनच्या माहितीनुसार, नदीप्रदूषणात पुणे औद्योगिक क्षेत्र हे अव्वल आहे. या परिसरातील बहुतांश कंपन्या प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करत नाहीत, असे आढळून आले आहे. या कंपन्यांमुळेच शहरातून वाहणार्‍या मुळा, मुठा व पवना नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेले आहे. या कंपन्यांसह शहरातील मोठमोठ्या सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (इटीपी) उभे करणे सक्तीचे असतानाही या कंपन्यांनी हे प्रकल्प उभे केलेले नाहीत. तसेच, बहुतांश कंपन्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरतदेखील झालेले नाहीत, असे दिसून आलेले आहेत. त्यामुळे रसायनेमिश्रित घाणपाणी हे सरळ नद्यांत सोडले जात आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आलेले आहे. तसेच, जैवविविधताही धोक्यात आलेली आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेनेदेखील कठोर कारवाईसत्र हाती घेणे गरजेचे आहे, अशी माहितीही या संस्थेच्यावतीने देण्यात आली.

पीसीएमसी भागात सर्वाधिक नियमभंग!
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या कंपन्यांना कायदेशीर नोटिसा पाठविलेल्या आहेत, त्यात सर्वाधिक कंपन्या या पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील आहेत. त्यात ऑटोमोबाईल, टायर्स, टेक्सटाईल्स, केमिकल, स्टील या कंपन्यांचा समावेश आहे. 2011 ते 2017 या कालावधीत एकूण 5000 कंपन्यांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आलेल्या होत्या. पुणे विभागात दररोज सरासरी 744 दशलक्ष लीटर सांडपाणी निर्माण होते. त्यातील 177 दशलक्ष लीटर सांडपाणी हे प्रक्रिया न करताच नद्यांत सोडले जात आहे, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सूत्राने सांगितले.