मुळा व मुठा नदीच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी मनसेचा पाठपुरावा

0

पुणे । शहरातून वाहणार्‍या मुळा व मुठा नदीच्या संवर्धन व सुशोभीकरण संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, हरित लवाद व पाटबंधारे खाते यांच्याकडे 2014पासून पत्रव्यवहार करत आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनीही पुण्यात येऊन बालगंधर्व रंगमंदिर व नदीपात्र सुशोभीकरण संदर्भात भूमिका मांडली होती.

2014 ते 2016 या कालावधीत वेळोवेळी नदीपात्र सुशोभीकरण व त्याच्या माध्यमातून नदीचे संवर्धन व सुधारणा या संदर्भात अनेक पत्रव्यवहार पालिका प्रशासन व जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभाग यांच्याकडे करत अनेक योजना मांडल्याचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सांडपाण्याबाबत नवीन योजना आवश्यक
महापालिकेकडून जायका प्रकल्पाच्या माध्यमातून नदी सुधारणेचे सुंदर चित्र दाखवण्यात आल्याने मनसेने या संदर्भातील पत्रव्यवहार व योजना थांबवली. जायका प्रकल्प काही कारणाने असेल, परंतु वास्तवात येताना दिसत नाही. तसेच या संदर्भातील कोणतेही काम नदी पात्रामध्ये होताना दिसत नाही. राज्य सरकारने सांडपाणी व इतर काही बाबींबाबत महापालिकांना नव्याने आदेश दिले आहेत. याबाबत पालिका प्रशासन, नागरिक व राजकीय पक्षांनी अधिकाधिक गंभीर होणे गरजेचे आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया, शहरातील सर्व एसटीपी प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने विकसित व कार्यरत करणे, नवीन एसटीपी प्लॅन्ट युद्ध पातळीवर निर्माण करणे, शहरातील नदीपात्रामधील जीवसृष्टीला पोषक वातावरण तयार करणे, नदीपात्राचे सुशोभीकरण नैसर्गिक पद्धतीने करणे, या भागात फुलबागा फुलवणे, नैसर्गिक अधिवास जपण्यासाठीची जैवसाखळी निर्माण करणे. नदीपात्राचा वापर शहरातील विद्यार्थ्यांना मैदानाच्या स्वरूपात करता यावा म्हणून रचना करणे यांसारख्या अनेक गोष्टी होऊ शकतात. या कमी शहरातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये, आस्थापने, कारखाने, नागरिक योगदान द्यायला तयार आहेत.

पर्यावरणाचे नुकसान नाही
या सर्व कमी महापालिकेला कोणतीही आर्थिक तरतूद करावी लागणार नाही की कर्ज काढावे लागणार नाही, हे नवनिर्माण नैसर्गिक पद्धतीने करण्यात येणार आहे, यामुळे नदीच्या पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. नदीपात्रासारख्या मध्यवर्ती ठिकाणी खेळण्यासाठीची मैदाने उपलब्ध होतील. नदीसंवर्धन व सुशोभीकरणाच्या कामी शहरातील नागरिक अधिक सजग व्हावे यासाठीच्या अनेक उपाययोजनांची सुरुवात करण्यासाठी मनसे सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.