मुंबई, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दिवसभर कायम होता. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यासह धरण परिसरात मुसळधार पाऊस पडला. येथील पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मुंबईसह कोकणात व मराठवाडल्याही पावसाने मंगळवारी झोडपून काढले. मुंबईत वादळीवार्यासह पाऊस कोसळत होता. संपूर्ण कोकणसह मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाट, वादळी वार्यांसह पाऊस पडत होता. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही दिवसभर जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे धरणसाठ्यांत चांगलीच वाढ झाली होती. पुढील 48 तासांत चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
कोल्हापूर, सातार्यात मुसळधार
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते. दुपारी 12:30 वाजता राधानगरीचे 7 दरवाजे उघडल्याने त्यातून 12 हजार 200 क्युसेक पाण्याचा भोगावती नदीत वेगाने विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. राधानगरीत चार तासात 80 मिमी. पावसाची नोंद झाली. सातार्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कोयना येथे मुसळधार पाऊस तर दुष्काळी भाग असलेल्या माण खटावमध्येही तुरळक सरी पडल्या.
मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता
मराठवाड्यातील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याने येत्या 5 दिवसात मराठवाड्यात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणात 87.61 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर विदर्भात येत्या तीन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकणात जनजीवन विस्कळीत
कोकणात रात्रीपासून वादळी वार्यासह पडणार्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीतील शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आल्याचे समजते. तर आंजर्ले येथील समुद्रकिनार्याजवळ एक मच्छिमारी बोट बुडाल्याची घटना घडली. तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बोटीतील सात मच्छिमारांचे प्राण वाचवले.