मुसळधार पावसानंतर भूस्खलन, दरड-इमारत कोसळून मृत्यूचे तांडव

सातारा/ रायगड/ मुंबई : गेल्या तिन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होवून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून ५ जण ढिगार्‍याखाली अडकले आहेत. तर ४ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीतील खेडमधील पोसरे बौद्धवाडीत मीठ डोंगर घरांवर कोसळला. असून जवळपास १७ नागरिक ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी एक शेतकरी दुचाकीसह पुरात गेल्याने मृत्यू झाला होता.
सातारा जिल्ह्यातील वाई आणि पाटण तालुक्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. घरांवर दरड कोसळल्याने ढिगार्‍याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाटण तालुक्यातील मोरणा-गुरेघर भागातील आंबेघर गावामध्ये दरड कोसळली आहे. दरड दोन तीन घरांवर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ढिगार्‍याखाली ७ ते ८ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोंढावले जवळ देवरुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. यामुळे चार ते पाच घरे ढिगार्‍याखाली गेली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रशासन घटनास्थळी पोहचले असून काही लोकांचा संपर्क होत नसल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या २७ नागरिकांची सुटका रात्री करण्यात आलेली असून, अजून २ महिला मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या आहेत. ढिगार्‍याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद

पावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोली घाटामध्ये शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व त्यांच्या सहकार्‍यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली. तत्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला.

मुंबई इमारतीचा भाग कोसळला; ३ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाच वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणार्‍या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे.
मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगार्‍याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगार्‍याखाली अडकले आहेत.