मुसळधार पावसामुळे भात पीक पडले पिवळे

0

चिंबळी परिसरातील स्थिती; शेतकरीवर्ग हवालदिल

चिंबळी : गेल्या पंधरवड्यात चिंबळी परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे या परिसरातील भाताच्या पिकाला फटका बसला आहे. भात पीक पिवळे पडले असून, शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. जोरदार पावसामुळे भात पिकाची खाचरे पाण्याने तुडूंब भरली होती. या खाचरांमधील पाण्याचा निचरा लवकर न झाल्याने त्याचा परिणाम भात पिकावर झाला आहे. वेळीच पीक परिस्थिती सुधारली नाही तर, भाताचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटेल, अशी भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

बाजरीच्या पिकालाही फटका
मुसळधार पावसाचा फटका बाजरीच्या पिकालाही बसला आहे. अनेक शेतांमधील बाजरीचे पीक पूर्णपणे कोसळले आहे. दुसरीकडे सोयाबीन तसेच, वाल, मूग, चवळी, उडीद या कडधान्य पिकांनाही काही प्रमाणात फटका बसला आहे. कडधान्य पिकांच्या शेंगांची सध्या तोडणी सुरू आहे. पावसामुळे ही कामे मध्यंतरी खोळंबली होती. आता शेंगा तोडण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कांद्याच्या रोपांचे नुकसान
चिंबळी, माजगाव, मोई, निघोजे, मरकळ, गोलेगाव या परिसरात पावसाळ्यानंतर रब्बी हंगामात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यासाठी जुलै ते ऑगस्टपासूनच पूर्वतयारी सुरू होते. कांद्याचे रोप लावले जाते. मात्र, उत्तरार्धात आलेल्या जोरदार पावसामुळे कांद्याच्या रोपांचेदेखील खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा कांद्याची लागवड कमी प्रमाणात होणार आहे. अनेक शेतकर्‍यांची कांद्याची रोपे वाया गेल्याने शेतकर्‍यांनी आता दुसरीकडून रोपे मागविली आहेत.