मुसळधार पावसासह मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला

0

मुंबई ।  राज्यात मान्सूनचे दमदार हजेरी लावली असून बुधवारी रात्रीपर्यंत मान्सूनने अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. आता 48 तासात पुर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल हवामानशास्त्रीय घटकांची उपलब्धता असल्याने 16 जूनपर्यंत मान्सून राज्यव्यापी होऊन गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. बुधवारी कोकणासह घाटमाथ्यावर, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भाचा काही भाग, येथे मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्याची नोंद आहे.

राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता
केरळपासून महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आसाम, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,छत्तीसगड परिसरातही चक्रीय वार्‍यांची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतीवृष्टी होण्याची शक्यताही पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.कोकणच्या दक्षिण भागावरही कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. त्याची तीव्रता वाढल्यास पावसाचा मुक्काम वाढू शकतो. सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी नाशिकमध्ये सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण उडाली. तर उस्मानबादमध्ये पाऊस चांगलाच कोसळला. केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर महापालिकेचे मुख्यालयही गुडघाभर पाण्याखाली गेले होते. पुण्यातही बुधवारी दमदार पाऊस झाला.

मुंबईतही रात्री पावसाचा तडाखा
मुंबईत बुधवारी रात्री पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने घाटकोपर आणि मुलूंड भागात चांगलेच पाणी पाणी झाले होते. पुण्यात रात्री साडेआठपर्यंत 51.8 मिलीमीटर तर लोहगाव येथे 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हडपसर, येरवडा, कात्रज, वाघोली या उपनगरांसह जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, खेड, शिरूर येथेही चांगला पाऊस झाला.

वैजापूरमध्ये घरांची पडझड, नदी-नाले खळाळले
वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव परिसरात आज साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे परिसरातील नदी नाले ओसांडून होते. या पावसामुळे ढेकू नदीला पाणी आले होते. . मृग नक्षत्रातील या पावसामुळे लागवड केलेल्या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकूण मृग नक्षत्रात लागवड केल्याने उत्पादन क्षमता वाढते असे जुने जाणते सांगतात.