मुस्कटदाबीनंतरही कामगार चळवळ जोमात!

0

पुणे : देशात भांडवलदार आणि धर्मांधशक्ती हे हातात हात घालून चालत असून, या देशातील प्रसारमाध्यमे त्यांची बटीक झाली आहेत. उदंड मुस्कटदाबीनंतरही कामगार चळवळ जोमात असून, असंघटीत कामगार हाच या चळवळीचा खरा नायक आहे, असे प्रतिपादन राज्य रिक्षा फेडरेशनचे प्रदेश सचिव आणि रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार यांनी केले. श्री पवार यांनी दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कामगार चळवळ, रिक्षा पंचायतीच्या मागण्या, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोऱणांमुळे कामगार चळवळीवर झालेला परिणाम याबाबत सविस्तर उहापोह केला.

चळवळीची मुस्कटदाबी समोर येत नाही!
नितीन पवार म्हणाले, सत्यशोधकीय समाज व्यवस्था हीच खरी चळवळ आहे. या चळवळीतूनच अनेक आंदोलने जन्माला आली. हमाल, माथाडी कामगार, रिक्षा चालक, अंगणवाडी सेविका, मोलमजुरी करणारे घटक, मोलकरीण महिला यांच्या हक्कासाठी चळवळी उभारल्या गेल्यात म्हणून त्यांना त्यांचे हक्क थोड्या फार प्रमाणात का होईना मिळू शकले. रिक्षा पंचायत असो, रिक्षा फेडरेशन असो की सत्यशोधक चळवळी असो, ही मंडळी रस्त्यावर आलीत म्हणून त्यांच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्यात. आज असंघटीत कामगार हेच चळवळीचे खरे नायक आहेत. दुर्देवाने भांडवलदार आणि धर्मांधशक्ती हातात हात घालून चालत असून, प्रसारमाध्यमे या वर्गाची बटीक झाल्याचे दिसते. त्यामुळे सरकारकडून होत असलेली मुस्कटदाबी सर्वांसमोर येत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

सत्ता हे काही अंतिम उद्दिष्ट नाही!
अनेक समाजघटक असे आहेत, त्यांना त्यांचा जन्म हा जन्मठेपेसारखा वाटतो. त्यांच्यासाठी कुणी तरी लढायला पुढे आले पाहिजेत. म्हणून, आम्ही चळवळ चालवित आहोत. सद्या डावी चळवळ ही देशातील वातावरणाशी जुळवून घेत आहे. या चळवळीतून कन्हैय्याकुमारसारखे तरुण नेतृत्वही पुढे आले आहे. सद्या जातीयवादी सरकार सत्तेवर आहे; या आधीचे सरकार फारसे विरोधी नव्हते, असेही पवार यांनी याप्रसंगी सांगितले. चळवळ सत्तेला स्पर्श का करू शकली नाही? असे विचारले असता, त्यांनी चळवळीत चढ-उतार चालूच असतात, सत्यशोधकीय समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सत्ता हे काही आमचे अंतिम उद्दीष्ट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या राज्यात रिक्षा आंदोलने झाली, कामगारांची आंदोलने झाली, असंघटितांची आंदोलने उभारली गेली. म्हणूनच, सरकारकडे या उपेक्षित वर्गाचा आवाज पोहोचू शकला, असेही पवार यांनी याप्रसंगी सांगितले.

जमावबंदीचा दहशतवाद!
राज्यात वर्षभर जमावबंदीचा आदेश कायम असतो, आज काय इंग्रजांचे राज्य आहे का? असा सवालही नितीन पवार यांनी केला. पूर्वी इंग्रजांच्या काळात दोन-चार भारतीय एकत्र येऊ नये म्हणून, जमावबंदी लागू केली जात होती. आज देश स्वातंत्र्य झाला तरी या ना त्या निमित्ताने जमावबंदीचा आदेश लागू असतो. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची सोयच राहिली नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.