मुंबई । 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला मुख्य दोषी मुस्तफा डोसा याचा बुधवारी दुपारी रुग्णालयात उपचार सुरू असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डोसाला मंगळवारी रात्री उशीरा जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप आल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचवेळी अचानक छातीत दुखू लागल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. तापाने फणफणलेल्या डोसाने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंगाधिकार्यांकडे केल्यानंतर अधिकार्यांनी त्याला मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मुस्तफा डोसा, अबू सालेम यांच्यासह पाच आरोपींना हत्या, कटकारस्थान याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. यासोबतच या सर्व आरोपींना टाडा कायद्यांतर्गतदेखील दोषी ठरवण्यात आले होते. 16 जून रोजी हा निकाल देण्यात आला होता. मुंबईतील 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेननला याआधीच फाशी देण्यात आलेली आहे. तर अलीकडेच‘मुस्तफा डोसा 1993 च्या बॉम्बस्फोट कटातील एक महत्त्वाचा सूत्रधार होता. या बॉम्बस्फोटात त्याची भूमिका महत्त्वाची होती,’ असे सीबीआयने टाडा न्यायालयात सांगितले होते. मात्र न्यायालयात याचा निर्णय होण्याआधीच मुस्तफाला मृत्यूने गाठले.
स्फोटांचा मुख्य सुत्रधार
मुंबईत 1993 साली झालेल्या बाँबस्फोटांनी अवघा देश हादरला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी मुस्तफा डोसाने दुबई/पाकिस्तानातून स्फोटके, एके-47 रायफल्स असा शस्त्रसाठा रायगडच्या दिघी बंदरात उतरवला होता. 9 जानेवारी 1993 साली ही सामग्री दिगी बंदरात पोहोचली. हा माल उतरवताना कोणीही आठकाडी करु नये यासाठी त्याने त्यावेळच्या कस्टम अधिकार्यांनाही लाच दिली होती. बाबरी मशीद पाडल्यानंतर डोसाने दुबईत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहिम आणि इजाज पठाण हजर होते. यात बाँब स्फोटांचा कट शिजवण्यात आल्याचे तपासातून सिध्द झाले होते. देशात प्रथमच या बॉम्बस्फोटात आरडीएक्स स्फोटकांचा वापर झाला. दुसर्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कुठल्या दहशतवादी हल्ल्यात इतक्या मोठया प्रमाणावर स्फोटकांचा वापर झाल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.
नैसर्गिक मृत्यू
मंगळवारी रात्री उशिरा छातीत दुखत असल्याने डोसाला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे. जे. रूग्णालयातील जेल वॉर्डात त्याच्यावर मंगळवारी रात्रीपासून उपचार सुरु होते. हायपरटेन्शन आणि वाढलेल्या मधुमेहाच्या त्रासावरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली होती. मुस्तफाच्या छातीतही संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर आज दुपारी 3.30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डोसाने सुनावणी सुरु असताना त्याला ह्दयविकाराचा त्रास असून बायपास सर्जरीची आवश्यकता असल्याने टाडा न्यायालयाला सांगितले होते. डोसाला हायपरटेंशन आणि डायबिटीसचाही त्रास होता. मुस्तफा डोसाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.
सीबीआयने केली होती फाशीची मागणी
विशेष टाडा न्यायालयाने 16 जून शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. तर सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांनी मुस्तफा आणि फिरोजची बॉम्बस्फोटातील भूमिका स्पष्ट करत त्यांना कठोरात कठोर मृत्यूदंडाची अर्थात फाशीच्या शिक्षेची मागणी विशेष टाडा न्यायालयात केली होती.
मुंबई बॉम्बस्फोटातील मुस्तफा डोसाचा गुन्हा याकूब मेननपेक्षा अधिक गंभीर होता. त्यामुळेच मुस्तफाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेननला याआधीच फाशी देण्यात आलेली आहे. ‘मुस्तफा डोसा 1993 च्या बॉम्बस्फोट कटातील एक महत्त्वाचा सूत्रधार होता. या बॉम्बस्फोटात त्याची भूमिका महत्त्वाची होती,’ असे सीबीआयने टाडा न्यायालयात सांगितले होते.