मुस्तफा डोसा आणि फिरोज खानला फाशी द्या!

0

मुंबई । मुंबई शहराला हादरवून सोडणार्‍या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील दोषी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयकडून करण्यात आली. मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मुस्तफा डोसा आणि सालेमसह फिरोज अब्दुल रशिद खान, करीमुल्ला खान उर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर महोम्मद र्मचट उर्फ ताहिर टकल्या या पाचजणांना न्यायालयाने टाडा कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या कलम 120 (ब) नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अंमलात आणून शेकडो निष्पापांची हत्या करणे वा हत्येचा कट रचल्याच्या प्रमुख आरोपांमध्ये दोषी ठरवले होते व रियाझ सिद्दीकी याला केवळ टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले होते. तर अब्दुल कय्यूम करिम शेख हा एकमेव आरोपी आहे, ज्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.

फिरोज खानचा न्यायालयात आक्रोश
मुंबई बॅाम्बस्फोट खटल्याच्या दुसर्‍या टप्याची सुनावणी सुरू आहे. सध्या दोषींच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात 129 आरोपी आहेत. त्यातील 100 जणांना त्यांच्यावरील आरोपानुसार टाडा न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेप अशा शिक्षा सुनावल्या आहेत. यामध्ये मुस्तफा डोसा आणि फिरोज खान यांचाही समावेश आहे. आधीच्या सुनावणीत फिरोज खानने आजन्म कारागृहात ठेवा पण फासावर लटकवू नका, असा आक्रोश न्यायालयात केला होता. तर आपले वर्तन किती चांगले आहे हे दाखवण्यासाठी त्याने कारागृहातील दोन आरोपींना साक्षीदार म्हणून हजर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्याची विनंती मान्यही करण्यात आली. मात्र बुधवारी त्याच्या वकिलांनी हे साक्षीदार तपासण्यास नकार दिला. परिणामी वेळ वाया गेल्याच्या कारणास्तव न्यायालयाने फिरोजला दोन हजार रुपयांचा दंड सुनावला होता. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी फिरोज खान याचा बॉम्बस्फोटाच्या कटातील सहभाग याकुब मेमन इतकाच महत्त्वपूर्ण असल्याचा दावा करत त्याला फाशी देण्याची मागणी केली.