मुंबई । ज्येष्ठ अभिनेते नासिरूद्दीन शाह नेहमीच त्यांची मत ठामपणे मांडतात. अभिनय, कला आणि रंगमंच या गोष्टी कोळून प्यायलेल्या नासिरूद्दीन यांची एक मुलाखत सध्या बरीच चर्चेत आली आहे. एका इंग्रजी दैनिका दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे.
मी काही कट्टर मुसलमान नाही. किंबहुना मुस्लिम म्हणून मी कधीच माझी जाणिवपूर्वक ओळख करून दिली नाही. माझी पत्नी रत्ना हिंदू आहे. लव जिहाद ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या बरंच आधी आम्ही लग्न केलं. आम्ही दोघंही धर्माच्या मार्गावर वाहिलेलो नाहीत. दिवाळी आणि ईद हे दोन्ही सण आनंद देणारे आहेत आणि ते दोन्ही सण आम्ही तितक्याच उत्साहात साजरे करतो. त्यामुळे आमच्यातील धार्मिक भिन्नतेमुळे आजवर कोणतीच अडचण निर्माण झालेली नाही, असे नासिरूद्दीन यांनी सांगितले.
आम्ही दोघांनी ज्यावेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी जर का आम्ही धर्माचा विचार करत त्यामुळे उदभवणार्या अडचणींवर जास्त लक्ष दिलं असतं तर आमचे नाते पुढे गेलेच नसते, असे म्हणत त्यांनी माझ्या आयुष्यात धर्माची भूमिका कधीच महत्त्वाची नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम जनसमुदायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही फारसा पारदर्शक नाही, असे ठामपणे सांगत नासिरूद्दीन म्हणाले, मला असा एकही दिवस आठवत नाही जेव्हा मुसलमानांना देशद्रोही म्हणून पाहिले गेले नाहीये. या गोष्टीचे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले नाहीये. ही अशा प्रकारची परिस्थिती एकदातरी आमच्यावर धडकली आहे. या मुलाखतीत नासिर यांनी अत्यंत महत्त्वांच्या मुद्द्यांकडेही सर्वांचं लक्ष वेधलं.
पाकिस्तान म्हणजे जणू काही स्वर्ग आहे, अशी काही जणांकडून अनेक मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जाते. पण त्याचवेळी ज्यांना हा देश आपला आहे असे वाटते आहे आणि भारताचे नागरिक असल्याबद्दल ज्यांना अभिमान आहे त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दलही शंका उपस्थित करण्यात येत आहे. मुस्लिमांना परके ठरवण्यामागे जो काही कट आहे तो इप्सित साध्य झाल्यावर नक्कीच मागे पडेल. पण दरम्यानच्या काळात जे काही घडेल तो वेगळाच विषय असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कडवट विचार करणार्यांच्या आणि त्याचे पेहरावातून दर्शन घडवणार्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मग ते टिळा लावणारे असो की दाढी वाढवणारे. त्यांची संख्या डोळ्यांना जाणवण्या इतपत वाढली आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये अशी स्थिती नक्कीच नव्हती. आज हा जो बदल घडतो आहे, तो काळजी करायला लावणार आहे, असे नासिरूद्दीन शाह यांनी म्हटले आहे.