नवी दिल्ली : देशातील मुस्लीम समुदयात अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. सद्याची परिस्थिती फारशी चांगली नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीन अन्सारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या केंद्रीय सरकारचे कान उपटले. उपराष्ट्रपतिपदाचा दुसरा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अन्सारी यांना राज्यसभेत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यानिमित्त राज्यसभा दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तर राज्यसभेत निरोप समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणावर चिमटे काढत, त्यांच्या कामाचेही कौतुक केले. गेली दहा वर्षे तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी होती. प्रत्येक गोष्ट घटनेच्या चौकटीत राहून करावी लागायची. हे करताना कदाचित तुमची घुसमटही झाली असेल. पण, यापुढे ती भीती नाही. तुम्हाला सुटकेचा आनंद घेता येईल. मूळ विचारधारेनुसार काम करण्याची आणि बोलण्याची संधी तुम्हाला मिळेल, अशा सूचक शब्दांत मोदींनी अन्सारींना राज्यसभेतून निरोप दिला.
मोदींकडून कौतुक अन् टीकाही!
राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती म्हणून दुसरा कार्यकाळ पूर्ण करणार्या हमीद अन्सारी यांना शुक्रवारी राज्यसभेत निरोप देण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांची भाषणे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्सारी कुटुंबाच्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा दाखला देत, त्यांचे कौतुक केले. राज्यसभा टीव्हीला काल दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत अन्सारी यांनी देशातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे पडसादही मोदींच्या भाषणातून उमटले. निरोपाच्या भाषणात मोदींनी अन्सारी यांना जोरदार चिमटे काढले. भारताचे राजदूत म्हणून अन्सारी यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करून मोदी म्हणाले, राजकीय मुत्सद्द्याचे काम काय असते हे मला पंतप्रधान झाल्यानंतर खर्याअर्थाने कळाले. त्यांच्या हसण्याचा, हात मिळविण्याच्या पद्धतीचा नेमका अर्थ काय असतो, हे पटकन समजत नाही. कारण, त्यांचे प्रशिक्षणच तसे झालेले असते. अन्सारी यांना गेल्या दहा वर्षांत या कौशल्याचा बराच उपयोग झाला असेल, असा टोलाही मोदींनी याप्रसंगी लगाविला.
भारतीय मूल्ये पायदळी तुडवायला नकोत!
दरम्यान, 80 वर्षीय अन्सारी यांनी उपराष्ट्रपतिपदाचा दुसरा कार्यकाळ बुधवारी पूर्ण केला होता. त्यांनी आपल्या मुलाखतीत देशातील असहिष्णूतेचा मुद्दा प्राकर्षाने उपस्थित केला. धर्मांध व जातीयवादी विचारांना त्यांनी ‘धोक्यात आणणारा विचार‘ असे संबोधित केले. काही नागरिकांच्या भारतीयत्वावर तुम्ही कसा काय संशय घेऊ शकता? असा सवालही मोदी सरकारला केला. राज्यसभा टीव्हीचे ख्यातनाम पत्रकार करण थापर यांनी ही मुलाखत घेतली होती. मुस्लीम समुदयाच्या चिंतेबाबत आपण पंतप्रधानांना अवगत केले होते का, असे अन्सारी यांना विचारल्यानंतर त्यांनी होय असे उत्तर दिले. गोरक्षा असो किंवा इतर मुद्दे असो, जमावाद्वारे मुस्लिमांना ठार मारले जात असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. भारतीय मूल्यांना अशाप्रकारे पायदळी तुडविणे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही. कायद्याने त्याचे काम केले पाहिजेत, तद्वतच नागरिकांनीही कायद्याचा सन्मान केला पाहिजेत, असेही अन्सारी याप्रसंगी म्हणाले होते.