मुस्लिम कब्रस्तानासमोरील बिअर शॉपी अखेर बंद

0

नागोठणे । मुस्लिम कब्रस्तानासमोरील बिअर शॉपी बंद करण्यात यावी या मागणीसाठी कलंदर कुवारे नामक तरुण, प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसला होता. ग्रामपंचायतीने हे दुकान या जागेतून बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कुवारे यांनी उपोषण मागे घेतले होते. यासाठी सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले होते व हा मुस्लिम एकतेचा विजय झाला असल्याचे समाजाचे नेते असगर मुल्ला आणि नासीर पानसरे यांनी स्पष्ट केले. मच्छी मार्केट नजीकच्या मुस्लिम कब्रस्तानासमोर बिअर शॉपी चालू करण्यासाठी मनोज पंजाबी यांना नागोठणे ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिल्यानंतर पंजाबी व संतोष वाघमारे यांनी अबकारी शुल्क खात्याची परवानगी घेऊन दुकान चालू केले होते.

या बाबतीत समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी विरोध केला होता, मात्र सत्ताधार्‍यांनी त्यांची दादफ़िर्याद ऐकली नव्हती असे मुल्ला यांनी सांगितले. 15 ऑगष्ट 2017 च्या ग्रामसभेत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो बंद करणेबाबत ठराव केला होता. परंतु सदरचा ठराव ही वेगळ्या पद्धतीने लिहून अबकारी खात्याकडे मार्गदर्शन मागितल्याचे नमूद करीत आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तरुण कार्यकर्ते इम्रान मुल्ला यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यानंतर हे उघड झाले होते. असा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कलंदर कुवारे यांनी रोहे तहसीलदार,गटविकास अधिकारी, नागोठणे पोलिसठाणे तसेच नागोठणे ग्रामपंचायत यांना 26 जानेवारीला उपोषणाची नोटीस दिली व ते समाजाच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसले होते.

आता लढा डंपिंग ग्राऊंड बंदसाठी
यावेळी प्रशासन हादरले होते व बहुजन समाजातील अनेक मान्यवरांनी मुस्लिम समाजातील भावनांशी समरस होऊन उपोषणकर्ते तसेच मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता असे मुल्ला यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकारानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने नमते घेऊन संबंधित दुकान या जागेतून बंद करण्याबाबतचे पत्र उपोषणकर्ते कुवारे याना दिले व सर्व उपस्थितांसमक्ष उपोषण स्थगित झाले असल्याचे स्वतः जाहीर केले होते असे मुल्ला यांनी यावेळी स्पष्ट केले. हा आमच्या समस्त समाजाचाच विजय असून सत्ताधार्‍यांना सोबत घेऊन घरोबा करणार्‍यांना मुस्लिम समाजाने एकता दाखवून यश मिळविले आहे. यापुढे कब्रस्तान, उर्दू शाळा तसेच हजरत मिरा मोहिद्दीन शाहबाबा दर्ग्याजवळील डंपिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.