भुसावळ। शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील मुस्लीम बहुल भागात गेल्या आठ दिवसांपासून जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. दोन दिवसांवर ईद येऊन ठेपली असून देखील पवित्र रमजानच्या पर्वात परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे मात्र नगरपालिका पाणी पुरवठा सभापतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
खोदकाम केले मात्र दुरुस्ती रखडली
येथील खडका रोड, पापा नगर, रजा टॉवर, मुस्लिम कॉलनी अशा परिसरामध्ये जलवाहीनी फुटली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून याठिकाणी खोदकाम करुन पडले आहे. परंतु यात नविन पाईप टाकण्याची फुरसत देखील पालिका कर्मचार्यांना नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.
पाण्याच्या साठ्यात पडले जंत
या भागात मुस्लीम समाजबांधवांचा रहिवास आहे. सध्या पवित्र रमजानचे रोजे सुरु आहेत. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आज बडा जुम्मा दिवस असूनही पाणी नसल्यामुळे पुष्कळ अडचणी निर्माण होत आहे. रहिवाशांनी करुन ठेवलेला आधीचा पाण्याचा साठा हा संपला असून व काही ठिकाणी पाण्यात जंत तयार झाली असल्याने ते पाणी फेकण्यात आले आहे.
रहिवासी झाले संतप्त
याबाबत नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती किरण कोलते यांना विचारणा केली असता न पाईप लाईन जी गावाकडे येते ती फुटल्याने खडका रोड, पापा नगर, रजा टॉवर, मुस्लिम कॉलनी अशा परिसरामध्ये आठ दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे.यासाठी जळगावला जाऊन पाईप आणावे लागणार ते पाईप किती दिवसांनी येणार हे सांगता येत नाही.ते आल्यावर काम किती दिवसांनी होणार हे हि सांगू शकत नाही अशी माहिती पाणीपुरवठा सभापती किरण कोलते यांनी दिली. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.