धुळे। शहरातील मुस्लिम बहूल भागात मुलभूत नागरी सुविधाही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी शनिवारी मनपा आवारात येवून निदर्शने केली. तर निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या.
या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत असून ऐन उन्हाळ्यात हा उपवासाचा महिना आल्याने मुस्लिम बांधवांना त्रास होणार आहे. या भागात वेळेवर पाणीपुरवठा करणे, बंद पथदिवेसुरु करणे, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करणे, गटारी साफ करणे, रात्रीच्या वेळी सार्वजनीक शौचालयात लाईट व पाण्याची व्यवस्था करणे या मागण्या या आधीदेखील करण्यात आल्या. मात्र मनपा प्रशासन ढिम्म असून कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरीकांचा संयम सुटला आहे.
मुलभूत सोयींचा अभाव
शहरातील अकबर चौक, कबीर गंज, कामगार नगर, गरीब नवाज नगर, जामचा मळा, देवपूरातील नुराणी मश्जिद परिसर, मच्छिबाजार, मोगलाई याठिकाणी मुस्लिम बहूल वस्ती असून किमान रमजानच्या पार्श्वभूमीवर मुलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. मुस्लिम ओबीसी, एसबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. अशपाक शेख, जुबेर अन्सारी, लुकमान शेख, जलील आफताब, सलीम अन्सारी, शरीफबावा, गुलाम काझी आदींसह समाजबांधव सहभागी झाले.