मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकाराचा विजय – विजया रहाटकर

0

मुंबई | “मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांचा विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’ संकल्पनेकडे नेणारा हा सकारात्मक निर्णय”, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ट्रिपल तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.

आजच्या निकालाने मुस्लिम महिलांच्या दीर्घ लढ्याला मोठे यश आले आहे. हा निर्णय मुस्लिम महिलांसाठी स्वाभिमानपूर्ण व समानतेच्या नव्या युगाची सुरूवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’ या संकल्पनेकडे नेणारा हा सकारात्मक निर्णय आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने न्यायालयात मांडलेल्या न्याय्य व विवेकपूर्ण भूमिकेसाठी आभार व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारने समग्र कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्याय देणारा कायदा लवकरच पुढे येईल. यंत्रणा संवेदनशील असल्याचे हे उदाहरण आहे. याआधी न्यायालयात केंद्र सरकारनेही तिहेरी तलाक पद्धतीविरूद्ध भूमिका घेतली आहे. तिहेरी तलाक वैध असल्याचे केंद्र सरकार मानत नाही. तसेच ही पद्धती सुरू राहावी, असेही सरकारला वाटत नसल्याचे केंद्राने याआधीच आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या सरकारची या प्रश्नांबाबतची भूमिका स्पष्ट आहे. राज्य महिला आयोगानेही विविध उपक्रमांमधून मुस्लिम महिलांची मानसिकता जाणून घेत अन्यायी प्रथेविरूद्ध उभे राहण्यासाठी मानसिक बळ दिले असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले.

देर है, अंधेर नही – डॉ. नीलम गोऱ्हे
‘देर है, अंधेर नहीं’ हेच या निकालाने सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. मुस्लीम महिलांच्या अनेक पिढ्यांनी या कायद्याच्या आतापर्यंतच्या स्वरूपामुळे अपमान, अवहेलना व सामाजिक हानी सहन करावी लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम समान नागरी कायद्याचा आग्रह धरला होता. मुस्लीम विवाह तथा वैयक्तिक कायदा बदलून तो स्त्रियांना जाचक बनविण्याचे काम तत्कालिन काँग्रेस सरकारने केले होते. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने राजनैतिक व्यासपीठावरच म्हणजे संसदेवर जबाबदारी टाकून महत्त्वाचे कर्तव्य केले आहे. त्यानुसार तसा कायदा संसद लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुस्लिम भगिनींच्या सक्षमीकरणाचा निर्णय – अॅड. माधवी नाईक
तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुस्लिम भगिनींच्या सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवून मुस्लिम महिलांच्या सन्मानाचा पाया रचला आहे. अल्पशिक्षण, अनारोग्य, आर्थिक परावलंबत्व या साऱ्याचे मूळ कुठेतरी या एकतर्फी घटस्फोटाच्या परंपरेत दडले होते. नऊ कोटी मुस्लिम महिलांना आपले अधिकार मागण्याचा मूलभूत हक्क या निर्णयाने दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.