मुस्लिम म्हणून अफझलखानाला मारले नाही

0

पुणे । छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज सगळया धर्मांचे होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारले नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तो स्वराज्याचा शत्रू म्हणून. मुस्लीम म्हणून त्याला संपवले नाही असे पवार म्हणाले. पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या इतिहासावर पवारांनी ओरखडे ओढले.

जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास मांडला जातोय
समाजातील तरुण पिढीसमोर काही लोकांकाडून जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास मांडला जात असून, त्याला यश मिळत आहे. हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमीतर्फे श्रीमंत कोकाटे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, लेखक श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराजांचा नौदल प्रमुख मुस्लीम होता
शिवाजी महाराजांचा नौदल प्रमुख मुस्लीम होता असे त्यांनी सांगितले. इतिहास संशोधक शेजवलकरांच्या लिखाणाचा दाखला देऊन पवारांनी शिवाजी महाराज गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते असेही विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणा-यांना त्यांचा विरोध होता. शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी असते तर, त्यांनी अफजल खानाचा वकिल कृष्णाजी कुलकर्णीला सोडले असते. पण त्यांनी कृष्णाजी कुलकर्णीचाही वध केला. रयतेचे राज्य स्थापन करण्याच्या आड येणार्‍यांचा विरोध मोडून काढताना त्यांनी हिंदू, नाती-गोती याची पर्वा केली नाही असे पवार म्हणाले.