रांची : योगा शिकविते म्हणून रांचीच्या हटिया परिसरातील एका मुस्लिम योग शिक्षिकेच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राफिया नाज असे या शिक्षिकेचे नाव आहे. दगडफेकीनंतर तिच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी एका चॅनेलवर राफियाची मुलाखत झाली. त्यात तिने योग शिकवून उदरनिर्वाह करत असल्याचे म्हटले.
राफिया सार्वजनिकरित्या मंचावर योग शिकवित असल्याने राग आल्यामुळे काही लोकांनी तिच्या घरावर दगडफेक केली. तिने सार्वजनिकपणे योग शिकवू नये म्हणून काही लोकांनी तिला धमकीही दिली होती. त्याविरोधात तिने रांची पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. राफियाच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर तिच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.