भुसावळ । शहरात ऑटोरिक्षा तसेच मोटारसायकलींची जाळपोळ करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मुस्लीम कॉलनी परिसरात बुधवार 22 रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरुने एका ऑटोरिक्षाची जाळपोळ केल्याने यात रिक्षाचे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित रिक्षाचालकाने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दिलेली असतानाही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. यावरुन पोलीस प्रशासन या घटनांकडे किती गांभिर्याने लक्षात घेते हे दिसून येते.
पहाटेच्या सुमारास घडली घटना
येथील मुस्लीम कॉलनी परिसरातील रहिवासी शेख शोएब शेख इक्बाल यांनी ऑटोरिक्षा (क्रमांक- एम.एच.19, व्ही-6907) आपल्या घराबाहेर लावली असता पहाटे 5 वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने या रिक्षाच्या छतास आग लावून पेटवून दिले. काहीतरी जळण्याचा वास येत असल्याने घरातील व्यक्तींनी घराबाहेर धाव घेऊन रिक्षाला लागलेली आग विझविली. याबाबत शेख शोएब यांनी बाजारपेठ पोलीस अज्ञात व्यक्तीविरुध्द रिक्षा जाळल्याची तक्रार दिली आहे. याबाबत पोलीसांना विचारणा केली असता नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले. याअगोदर देखील गेल्या आठवड्यात पटेल कॉलनी परिसरात दोन मोटारसायकल तर जाममोहल्ला व ग्रीन पार्क परिसरात रिक्षांनाही आग लावण्याची व काही वाहनांना जाळपोळ केल्याची घटना घडली होती. शहरात वाहने पेटविण्याचे सत्र सुरुच असून कारवाईची गरज आहे.