मुस्लीम समाजातर्फे नगरपंचायतीच्या गटनेत्यांचा सन्मान

0

शिंदखेडा । मुस्लीम समाजाला नगराध्यक्षपद दिल्यामुळे मुस्लीम समाजातर्फे नगरपंचायतीचे गटनेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण ईलीयास कुरेशी होते. शिंदखेडा शहराच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षपदी शाहनाज बशीर बागवान या मुस्लीम महिलेची वर्णी लागली. यामुळे नगरपंचायतीचे गटनेते व माजी पं.स.सभापती प्रा.सुरेश देसले, माजी सरपंच व गटनेते अनिल वानखेडे तसेच नगराध्यक्षा शाहनाज बागवान यांचा सत्कार मुस्लीम समाज बांधवांकडून करण्यात आला.

गावाच्या विकासासाठी एकत्रिकरण
यावेळी बोलतांना प्रा.देसले म्हणाले, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी दोन गट होते. तालुक्याचा बाहेरून आलेल्या नेत्यांमुळे गावातील नेत्यांमध्ये वाद होतात. त्यामुळे गावाचा विकास होत नाही. निवडणुकीपूर्वी राजकारण करून गावाच्या विकासासाठी दोन्हीही गट एकत्र झाले आहेत. निवडणूक कोणतीही असो मुस्लीम समाज प्रत्येकवेळी आमच्या सोबत असतो. मुस्लीम समाजाचे हे ऋण फेडण्यासाठी म्हणूनच मुस्लीम समाजाला नगराध्यक्षपद दिले. यापुढेही मुस्लीम समाजाचा असाच पाठिंबा मिळेल, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गटनेते अनिल वानखेडे यांनीही निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याविषयी आभार व्यक्त केले. नगराध्यक्षा बागवान यांनी विकासाला प्राधान्य असेल असा विश्‍वास देत गटनेत्यांनी दिलेल्या या संधीबद्दल त्यांनी गटनेत्यांचे ऋण व्यक्त केले.

हिंदू-मुस्लिम असा कोणताही मुद्दा नाही
कार्यक्रमाचे अध्यक्ष ईलीयास कुरेशी म्हणाले, दोन्ही गट गावाच्या विकासासाठी एकत्र आलेत ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. हिंदू-मुस्लीम असा कोणताही मुद्दा शहराच्या राजकारणात नाही तरी मुस्लीम समाजाला नगराध्यक्षपद दिले याबद्दल त्यांनी गटनेत्यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दिपक देसले, नगरसेवक उल्हास देशमुख, अशोक देसले, बानुभाई भिल, सुनंदा माळी, निंबाजी सोनवणे, चंद्रसिंह राजपूत, सुनील वाडिले, गणेश भिल, मोतीराम पाटील, सलीम नोभानी, देविदास कोळी, दिगंबर पाटील, शंकरराव शिरसाठ, हसन बोहरी, अब्बास बोहरी, प्रा.निरंजन वंदे, यशवंत चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शब्बीर खाँ पठाण, डॉ.इद्रीस कुरेशी, इकबाल तेली, इरफान शेख यांनी केले.