पुणे: मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी लष्कराच्या 4 जवानांविरोधात पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पीडित महिला खडकीतील लष्करी रुग्णालयात काम करते. आरोपींनी याच रुग्णालयात तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. खडकीतील लष्करी न्यायालयानं चारही आरोपींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पीडित महिला मूकबधीर असल्याचा गैरफायदा घेत जवानांनी तिच्यावर 4 वर्षे अत्याचार केले. यानंतर जुलैमध्ये तिने इंदूरमधील एका एनजीओशी संपर्क साधला. एनजीओमधील तज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या मदतीने पीडितेने आपला जबाब नोंदवला. ज्ञानेंद्र महिलेच्या सोबत पुण्याला आले आणि त्यांनी चारही जवानांविरोधात तक्रार दाखल केली. ‘जुलै 2014 मध्ये मी लष्कराच्या रुग्णालयात सेवा बजावत होते. त्यावेळी माझी नाईट शिफ्ट होती. त्यावेळी एका जवानानं वॉर्डच्या स्वच्छतागृहात नेऊन माझ्यावर बलात्कार केला. याप्रकरणाची तक्रार मी वरिष्ठांकडे केली. त्यांनी मला कारवाईचे आश्वासन दिले. याबद्दल माझी बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावलं. मात्र त्यांनीही माझ्यावर बलात्कार केला,’ असा जबाब महिलेनं नोंदवला आहे.
यानंतर या दोघांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेनं केला. आमच्यासोबत शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी दोघांनी पीडितेला दिली. यानंतर दोन्ही आरोपी आणखी दोन जवानांसोबत महिलेवर बलात्कार करायचे. हा धक्कादायक प्रकार चार वर्षे सुरू होता. महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोन जवानांनी तिचा व्हिडीओ चित्रीत केला होता. हाच व्हिडीओ दाखवून जवान तिला ब्लॅकमेल करायचे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करुनही काहीच कारवाई झाली नाही, असंदेखील पीडितेने तक्रारीत सांगितले आहे.