चाळीसगाव । येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या आत्महत्याप्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर निषेध मुक मोर्चा काढण्यात आला.
शहरातील सिग्नल पॉईंटपासून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिलांनी निषेधाचे बॅनर घेतलेले होते. सिग्नल पाईंटपासून स्टेशन रोडने तहसील कार्यालयावर मुक मोर्चा आला असता, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलिस उप निरीक्षक श्री. पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा, की उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील शिंपी समाजाच्या अल्पवयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव या बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या करून स्वतःची जीवन यात्रा संपवली. संजय घुमरे या नराधमाने अजाण प्रणालीवर अमानवी अत्याचार केला व तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराला घाबरून तिने आत्महत्या केली. या घटनेतील संबंधित नराधमाला अटक झाली असली तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी व पिडीत प्रणालीच्या हवालदिल झालेल्या कुटुंबीयांना न्याय व धीर द्यावा. या अमानवी घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चात शहरासह तालुक्यातील शिंपी समाजाचे स्री- पुरुष, युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Prev Post