‘मूडीज’च्या रेटिंगने बदलला सरकारचा ‘मूड’!

0

नवी दिल्ली : मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे, 13 वर्षांनंतर मूडीजने भारताच्या मानांकनात सुधारणा केली. मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘बीएए3’ वरुन ‘बीएएर2’ असे केले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर टीका केली जात असताना मूडीजने सरकारच्या या दोन्ही निर्णयांचे तोंडभरुन कौतुक केल्याने अर्थमंत्र्यांचा मूडही चांगला झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षभरापासून विरोधकांच्या रडारवर असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही संधी साधत विरोधकांवर हल्लाबोल केला. सरकारच्या आर्थिक निर्णयांबद्दल ज्यांच्या डोक्यात शंकाकुशंका आहेत, त्यांनी आता गंभीरपणे आत्मपरीक्षण करावे, असा टोला जेटली यांनी विरोधकांना हाणला.

मूडीजकडून रेटिंगमध्ये सुधारणा
मूडीजने भारतातील आर्थिक सुधारणा विचारात घेऊन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. गेल्या 13 वर्षांमध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली नव्हती. मात्र 2004 नंतर प्रथमच मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली. मूडीजकडून आतापर्यंत भारताला ‘बीएएर3’ रेटिंग देण्यात आले होते. 2004 मध्ये भारताला हे रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता भारताचे रेटिंग ‘बीएए2’ करण्यात आले आहे. ‘बीएए3’ गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून निच्चांकी दर्जा दाखवणारे रेटिंग आहे. याआधी मूडीजकडून 2015 मध्ये भारताचे रेटिंग ‘स्थिर’वरुन ‘सकारात्मक’ करण्यात आले होते.

‘आर्थिक सुधारणांसाठी पावले उचलण्यात आल्याने भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक असेल. यामुळेच भारताचे रेटिंग वाढवण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा फायदा बुडित खात्यात गेलेल्या कर्जांना होईल. अर्थविषयक सुधारणांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत होईल. यामुळे सरकारी कर्जाचे ओझे हळूहळू कमी होऊ शकेल, असे मूडीजने म्हटले आहे. कर्जाच्या ओझ्याचा देशाच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा धोक्याचा इशाराही मूडीजने दिला आहे.

अर्थमंत्र्यांचा विरोधकांना निशाणा
जीएसटी, नोटाबंदी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आधार लिंकिंगसारख्या निर्णयांचे कौतुक करत ’मूडीज’ने भारताच्या क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा केली. या निर्णयामुळे खूश झालेल्या जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था दिवसागणिक अधिक मजबूत होत असल्याचे अनेक पुरावे मिळत आहेत. मात्र, ’मूडीज’सारख्या संस्थेकडून त्यावर शिक्कामोर्तब होणे जास्त महत्त्वाचे आहे. सरकारच्या प्रयत्नांना पोचपावती मिळण्यास उशीर झाला असला तरी आम्ही याचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. ’मूडीज’ने मोदी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.